विजय वडेट्टीवर यांचा हादरवणारा गौप्यस्फोट, भाजपने नाक घासून प्रायश्चित्त घेण्याची केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीचे धोरण काँग्रेस सरकारच्या काळातील असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, जीआर निघाले तेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता. त्यावेळी भाजपने विरोध का केला नाही? मूग गिळून गप्प का बसले? कंपन्या स्वत:च्या होत्या म्हणून का? तुम्ही त्यात वाटेकरी होतात म्हणून का? अशा सवालांच्या फैरी वडेट्टीवार यांनी भाजपवर झाडल्या.

ते पुढे म्हणाले की, आम्ही संघर्ष केला. रस्त्यावर उतरलो, त्यामुळे सरकारने माघार घेतली. तुम्ही अडीच वर्षापासून सत्तेत आहात. मग या काळात जीआर रद्द करण्याचा निर्णय का घेतला नाही? मंत्रिमंडळात दुरुस्ती का केली नाही? तुम्हीच तो जीआर पुढे रेटत होतात हे स्पष्ट आहे.

अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कंत्राटी भरतीचा जीआर केवळ 15 संवर्गासाठी होता. तो मर्यादित होता. तो जीआर बदलून तुमच्या सरकारने 134 संवर्गासाठी केला. म्हणजे मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. त्यामुळे त्यांनी नाक घासले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

डिसेंबरपर्यंत सरकार 1 लाख पदं भरणार होते. आमच्याकडे सर्व माहिती आहे. त्यामुळे आम्ही तरुणांसह रस्त्यावर उतरलो. हा जीआर तरुणांना बेरोजगार करणारा असल्याने त्याची होळी करण्याचे आवाहन केले. एमपीएससी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांच्या मुळावर उठणारा हा निर्णय असल्याने विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरू लागले, आंदोलन करू लागले. त्यामुळे सरकार घाबरले आणि आपले पाप दुसऱ्याच्या अंगावर ढकलून जीआर रद्द केला. ही सरकारची नामुष्की आहे. सरकारची माघार आहे, घुमजाव आहे. यासाठी भाजपने नाक घासून प्रायश्चित्त करायला हवे, असेही वडेट्टीवर म्हणाले.