ऑक्टोबर हिटपासून सुटका होणार, थंडीची चाहूल लागणार; हवामान खात्याचा दिलासा देणारा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा तापमानवाढीचे वर्ष असल्याने त्याचा फटका राज्याला चांगलाच बसला आहे. मॉन्सूनने यंदा सरासरी पूर्ण न करताच परतण्याची सुरुवात केली आणि राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवत होता. त्यामुळे या काळात उकाडा असह्य झाला होता. आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे, असा दिलासादायक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच आता काही दिवसातच थंडीची चाहूल लागणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यात आता कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागणार आहे. विदर्भासह राज्यात ऑक्टोबर हिटचा कहर अजून कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. मुंबई आणि पुणे शहराच्या तापमानात घट झाली आहे. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागणार आहे.

दक्षिण हिंदुस्थानात ईशान्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. राज्यातही काही भागांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पीक कापणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.