24 डिसेंबरच, घोळ घालू नका! मुदतीवरून मनोज जरांगे यांनी खडसावले, रुग्णालयातून केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपोषण थांबवण्यापूर्वी माजी न्यायमूर्ती तसेच सरकारच्या शिष्टमंडळासमोर सगळे काही स्पष्ट ठरले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या मुदतीवरून कोणताही घोळ घालू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खडसावले आहे. 24 डिसेंबर ही अंतिम मुदत असून त्यात सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा, असेही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच माजी न्या. एम. जी. गायकवाड आणि न्या. सुनील शुक्रे यांच्या विनंतीला मान देऊन नवव्या दिवशी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. माजी न्यायमूर्ती तसेच सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळातील धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, अतुल सावे या मंत्र्यांसमोर जरांगे यांनी अतिशय स्पष्टपणे आपल्या मागण्या मांडल्या. सरकारला वेळ देण्याची तयारीही दाखवली. 24 डिसेंबर ही मुदत आपण सरकारला देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र जरांगे यांचे उपोषण सुटल्यानंतर मिंधे सरकारने लगेच कोलांटउडी मारत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ठरले नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी 24 डिसेंबर नव्हे, तर 2 जानेवारीपर्यंत मुदत असल्याचा गोलमाल केला.

आज या संदर्भात रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी स्वत: माध्यमांकडे खुलासा केला. सरकारचे शिष्टमंडळ येण्याअगोदर माजी न्यायमूर्तींशी चर्चा करताना सर्व काही स्पष्ट ठरले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आल्यानंतर त्यांनाही ही कल्पना देण्यात आली. सरकारच्या प्रतिनिधीने सर्व मुद्दे लिहून घेतले. त्यानंतरच उपोषण थांबवण्यात आले. मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तारखेचा घोळ घालू नका, दिलेला शब्द पाळा, असे खडे बोल मनोज जरांगे यांनी सुनावले.

वारसाच्या एका नोंदीवर प्रमाणपत्र द्या
न्या. शिंदे समितीने राज्यभर कुणबी नोंदी तपासाव्यात. त्यानंतर कुटुंबात एक जरी नोंद आढळली तरी सर्वांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. रक्तसंबंध, सोयरे, भावकी एवढेच मागेल त्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, या मागणीचा मनोज जरांगे यांनी पुनरुच्चार केला. सरसकट मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये आणि केलीच तर अत्यंत महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जरांगे यांच्या किडनीवर सूज
नऊ दिवसांच्या उपोषणाने मनोज जरांगे यांचे वजन 10 किलोने घटले असून त्यांच्या किडनी तसेच लिव्हरवरही सूज आली आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये डॉ. विनोद चावरे, डॉ. अमोल खांडे तसेच डॉ. अभिमन्यू माकणे यांचे पथक उपचार करत आहे. जरांगे यांची रोगप्रतिकारकशक्तीही कमी झाली आहे. त्यांना बरे होण्यासाठी किमान आठवडा तरी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.