कवडसे – गोष्ट इथेच संपत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

तू खूप वर्षांनंतर समोर येणार होतीस आणि मी मनातल्या मनात वाट पाहत होतो एका नव्या ऋतूची… असा ऋतू जो माझ्या आयुष्यातील सगळे उन्हाळे शांत करून जावा आणि तुझ्या प्रेमाचा पुन्हा एकदा चिंब पाऊस व्हावा. संध्याकाळी तू समोर येशील आणि जुन्या आठवांचे थवे पुन्हा परतून येतील असा विचार करत करत माझा दिवस गेला आणि ती संध्याकाळ आली.

ठरल्याप्रमाणे तूही समोर आलीस आणि अचानक अनपेक्षित अशा गोष्टी घडत गेल्या. तू समोर येऊनही अनोळखी असल्यासारखे भासवू लागलीस आणि काही क्षणांतच माझ्या मनात काहूर माजलं, असंख्य विचारांचं. तू असं का वागत होतीस हे कळत नव्हतं. सगळ्या गर्दीत तू हरवली होतीस की त्या गर्दीत मी तुला दिसत नव्हतो आणि जरी दिसलो तरी ओळख दाखवायची नाही असं ठरवून तू इथे आलीस होतीस की काय? विचारांनी मनात गर्दी केली. तू त्या गर्दीला घाबरत होतीस की तू तुलाच घाबरत होतीस, की माझ्या अस्तित्वाला घाबरत होतीस? जे तुला पुरतं ठाऊक होतं की, मी आयुष्याच्या कोणत्याही वळणावर कधीही समोर आलो तरी मला पाहताच तुझ्या मनात असंख्य तरल हळवी स्पंदने निर्माण होतील. तू पुन्हा माझ्यात रमशील किंवा हरवून जाशील तुझ्या माझ्या सगळ्या जुन्या आठवणीत. मग पुन्हा तुला तुझ्या विश्वात जाणं कठीण होऊन बसेल. कदाचित म्हणून तर तू टाळत नव्हतीस ना?

पण तुझा अबोला मला बेचैन करून जात होता. मला खूप प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडून हवी होती. तू एक जरी उत्तर दिलं असतंस डोळ्यांनी तरी सगळे प्रश्न सुटले असते तिथेच, पण तू नजरेला नजरसुद्धा भिडवली नाहीस. खरं तर आपली गोष्ट तिथेच सुरू झाली होती जेव्हा तुझी नजर माझ्या नजरेला भिडली होती पहिल्यांदा. त्यानंतर एक मोठा प्रवास सुरू झाला तुझा आणि माझा, जो अविरतपणे अजूनही सुरू आहे मनातल्या मनात. आपली पहिली भेट आणि त्यानंतर तुझं कायमचं दूर जाणं, तेव्हा वाटलं गोष्ट संपली आपली. पण तसं झालं नाही. तू पुन्हा समोर आलीस. नव्या प्रश्नांना घेऊन. त्यांची नवीन उत्तरं शोधताना एक नवी गोष्ट सुरू झाली. सगळं काही छान सुरू आहे असं वाटत असताना पुन्हा तू हळूहळू दूर गेलीस काही अबोल प्रश्न मागे सोडून. मग कधीतरी अधेमधे कुठल्यातरी अनामिक वळणांवर भेटत गेलो आपण, पण त्या भेटीत जुने बंध नव्हते. आज आपण भेटून, सगळे जुने बंध पुन्हा आठवून या ऋतूची एक नवीन गोष्ट सुरू होईल असं वाटत असताना ही भेट आजवरच्या सर्व भेटींपेक्षा खूप वेगळी ठरली.

पहिल्यांदा माझं मन मला सांगतंय की, हाच तो क्षण आणि हीच ती वेळ आहे, तुमची गोष्ट संपली आहे. तरी मला आतून असं वाटतंय की, पुन्हा कधीतरी एक नवा ऋतू येईल! त्या ऋतूत तू समोर येशील पुन्हा आणि सगळं काही माझ्या मनासारखं होईल. तू त्या गर्दीतून बाहेर पडून समोर येऊन एकटक पाहशील. आपले डोळे पुन्हा एकमेकांशी बोलू लागतील. मनातील एकेक जुने बंध सैल होत जातील. जगासाठी आणि त्या गर्दीसाठी जरी आपली गोष्ट कायमची संपलेली असली तरी आपल्या मनात आपली गोष्ट कायम सुरू राहील. मला मनापासून असं वाटतंय.

तू मला वेडा म्हणशील कदाचित, पण माझं मन मला एक गोष्ट सांगतंय की, जेव्हा आपल्याला वाटतं की, एखादी गोष्ट संपली, पण ती गोष्ट तिथे संपत नाही, तर ती गोष्ट खऱया अर्थाने तिथून सुरू होते आणि मला हेच वाटतंय की, तू आज जे वागलीस, त्याने एक नवीन गोष्ट सुरू झाली आहे. एक नवा प्रवास सुरू झाला आहे आपल्या नात्याचा. बघू या पुढे काय होतंय ते. पण मी नियतीला एकच सांगतोय की, आमची गोष्ट संपविण्याचे तू कितीही प्रयत्न कर, पण दिसत असली, वाटत असली तरी गोष्ट इथेच संपत नाही.

[email protected]