
>> सुहास मळेकर
नॉस्ट्राडॅमस हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता होऊन गेला. त्याने शेकडों वर्षांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरत आलेले आहे असा लौकिक आहे. ते किती खरे, किती खोटे ज्याने त्याने ठरवावे. कारण नॉस्ट्राडॅमसच्या या कथांमधून अनेकांनी आपापल्या दंतकथा घुसडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही गोष्टी तुम्हाला खरंच कुणीतरी सांगाव्या अशा असतात. कठीण प्रसंगी त्या जगण्यासाठी बळ देतात. भविष्य आणि ज्योतिष शास्त्रावर तितकासा विश्वास नसला तरी तरुणपणात वडिलांनी मनात ठसवलेल्या अशा गोष्टींनी कायम दिलासा देण्याचे काम केले.
आता एका दुःखद प्रसंगात ‘होणारी गोष्ट टळत नाही कधी’ हे एकाला समजावताना अशीच एक गोष्ट पुन्हा कामी आली. नॉस्ट्राडॅमस त्याच्या काळात सगळ्यांना हवाहवासा मित्र होता. मात्र तो अलौकिक असल्यामुळे त्याचे मित्रही बडे बडे नामांकित म्हणजे राजे, मांडलिक सरदार, सावकार आणि प्रतिष्ठत अशी मंडळी होती.
एकदा अशाच एका बडय़ा माणसाकडे त्याला जेवणाचं आमंत्रण होतं. बागेत आरामात गप्पागोष्टी रंगलेल्या असताना त्या यजमानाला नॉस्ट्राडॅमसला छेडायची लहर आली.
त्याने नॉस्ट्राडॅमसला म्हटले, “मित्रा, तुला पुढे घडणारी घटना अचूक सांगता येते तर हे सांगू शकशीलच, आता बागेत विहार करणारी काळा आणि पांढरा ही दोन बदपं, यांपैकी कुठल्या बदकाचं मांस आपण खाणार आहोत?’’ गर्विष्ठ मालक नॉस्ट्राडॅमसला ‘कसे पैचीत पकडले’ या आविर्भावात म्हणाला.
नॉस्ट्राडॅमसने अर्थात त्याला डोळ्यांसमोर दिसत असलेले भाकीत सांगितले, “आपण पांढऱया बदकाच्या मांसाची मेजवानी झोडणार आहोत!’’
यजमान हट्टाला पेटला, “मी इथला मालक आहे आणि मी जो आदेश देईन तोच इथे अमलात आणला जाईल…’’
त्याने ताबडतोब खानसाम्याला बोलावून त्याला मुद्दाम उलट हुकूम दिला, “आमच्या मेजवानीसाठी काळ्या बदकाच्या मांसाचा झणझणीत रस्सा बनव!’’
खानसामा हुकमाचा ताबेदार. त्याने काळा बदक समोरून नेऊन कापला आणि झणझणीत रश्शाची तयारी सुरू केली.
इकडे दोघां मित्रांचा गप्पांचा फड पुन्हा रंगला. एव्हाना ते पैजही विसरून गेले. मात्र जेवत असताना रश्शावर ताव मारता मारता यजमानाला पुन्हा आठवलं आणि त्याने नॉस्ट्राडॅमसला डिवचलं, “काय मित्रा, आता तरी मी जिरवली ना तुझी? तुझं भाकीत खोटं ठरलं.’’
नॉस्ट्राडॅमस जराही विचलित न होता म्हणाला,
“नाही, आपण पांढऱया बदकाचंच मांस खात आहोत, होणारी गोष्ट टळत नाही कधी!’’
यजमान लालेलाल झाला. “हे कसे शक्य आहे?’’
त्याने खानसाम्याला बोलावून घेतले.
लालबुंद झालेल्या मालकासमोर येऊन तो खाली मान घालून उभा राहिला.
“तुला मी काळ्या बदकाचा रस्सा बनवायला सांगितला होता आणि तू काळाच बदक कापून रस्सा बनविला आहेस, हो ना?’’
“हो मालक, मी काळा बदकच तुमच्या समोर कापला होता आणि मी काळ्या बदकाचाच रस्सा बनविणार होतो, पण…’’
“पण.. पण… काय?’’ मालकाचा पारा चढला होता.
“पण मी मांस साफ करून ठेवले होते आणि रश्शाची तयारी करत असताना एक लांडगा आला आणि ते मांस पळवून घेऊन गेला. मग मी दुसरा पांढरा बदक कापून त्याचा रस्सा बनविला!’’
मोठी माणसे हुशार असतात. अध्यात्म किंवा विज्ञान याच्या पलीकडे जाऊन आपल्या पूर्वजांनी अनेक दंतकथा आजपर्यंत आपल्याला धडा शिकविण्यासाठी उपयोगात आणल्या आहेत. प्रसंगानुरूप कधी त्या ‘केल्याने होत आहे रे’ सांगून मेहनतीचे महत्त्व लक्षात आणून देतात, तर कधी दुखद प्रसंगी ‘होणारी गोष्ट टळत नाही’ असे सांगून दिलासाही देतात. अशाच प्रकारे एखादी घटना घडायची असेल तर ते विधिलिखित असते हे सांगताना, खरं तर तेव्हा व्यथित असल्यामुळे समजावताना वडिलांनी कुठे वाचनात न आलेली ही गोष्ट सांगितली होती.





























































