….असे फक्त अक्कल नसलेल्या माणसालाच वाटू शकते; अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावे, असे अजित पवार म्हणाले होते. यावेळी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करत ठाण्याच्या पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असा आरोप केला होता. त्यावर आता प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

शरद पवारांना मी समजावू शकतो किंवा ते माझं ऐकतात, हे फक्त अक्कल नसलेल्या माणसाला वाटू शकते. जगात ज्याला अक्कल आहे, त्याला माहीत आहे, शरद पवार कुणाचेच ऐकत नाहीत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवना प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ठाण्याच्या एका पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, असे वक्तव्य अजित पवारांनी केले. तुमच्यावर त्यांचा विशेष राग आहे का? असा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांना मी समजावू शकतो किंवा ते माझे ऐकतात, हे फक्त अक्कल नसलेल्या माणसाला वाटू शकते. जगात ज्याला अक्कल आहे, त्याला माहीत आहे, शरद पवार कुणाचेच ऐकत नाहीत. सगळ्यांचे ऐकून स्वत:चा निर्णय घेणारा देशातला एकमेव नेता म्हणजे शरद पवार. ते माझे कसे काय ऐकू शकतात, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला आहे.

अजित पवारांच्या विधानाचे मलाच आश्चर्य वाटले, त्यांनी मला मोठं करून टाकलं. शरद पवारांनंतर त्यांनी थेट जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. मला या गोष्टीचा आनंद झाला. कधी कधी अशी टीका आपल्याला विनोद म्हणून घ्यावी लागते. पण होय, मी ठाण्याचा पठ्ठ्या आहे. त्यांनी टीका केली म्हणून आपण स्वत:ला कमी लेखून का घ्यायचे, असेही आव्हाड म्हणाले.