सुरक्षित भविष्याचे दीप उजळू या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आपल्या कुटुंबाला आपल्यानंतर किती रक्कम लागणार आहे याचा लेखाजोखा मांडून त्यावर उपाययोजना करू या. म्हणजे कुटुंबाची प्रत्येक दिवाळी आपण हयात असताना किंवा हयात नसताना आनंदानेच साजरी होईल.

– विषय एवढा गंभीर असूनदेखील अनेक कुटुंबांतील प्रमुख व्यक्ती या विषयाचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करीत नाहीत व आपल्या कुटुंबाचे भविष्य अंधारात ठेवतात. हिंदुस्थानात एकूण लोकसंख्येच्या 3.5 टक्के लोकांनी आपले भविष्य सुरक्षित केले आहे.

मित्रांनो आपल्याला ङ्खाऊक आहे की, दिव्याच्या भोवती प्रकाश असतो, पण दिव्याखाली अंधार असतो. जर पाहिले तर अंधाराचे साम्राज्य दिसेल. त्याचप्रमाणे काही कुटुंबे आपल्याला दुरून छान दिसत असतात. सजवलेले आलिशान घर, कार, फॉरेन ट्रिप्स आणि बरेच काही. अगदी रोजच दिवाळी…दृष्ट लागण्याजोगी जीवनशैली. दिवाळी सण सरल्यावर रोषणाई जशी गायब होते तशीच काहीशी अवस्था काही कुटुंबांची होते. चकचकीत दिसणाऱया रोषणाईमागचा अंधार जर आपण दूर नाही केला तर अंधाराचे साम्राज्य पसरेल.

जीवनशैलीमधली पहिली महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी लागणारा निधी. या निधीशिवाय जगणेच अशक्य होईल. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या निवृत्तीपर्यंत कुटुंबाला किती निधी लागेल याचे गणित मांडायला हवे व त्यावर उपाययोजना करायला हवी. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचे गणित. प्राथमिक ते बारावीपर्यंत, त्यानंतर उच्च व अतिउच्च शिक्षणाचा खर्च. जीवनशैली साकारण्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम विचारात घेणे, यात घर कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, इंटिरिअर कर्ज अशा सर्व कर्जांची बेरीज. या शिवाय आपल्या सहचारिणीच्या निवृत्तीसाङ्गी लागणाऱया रकमेचे गणित मांडल्यावर आपल्याला जी संख्या मिळेल, तेवढी आपल्या बँक खात्यात असायला हवी. ही रक्कम आपल्या बँकेत नसेल व घरातल्या व्यक्तीचे आकस्मित निधन झाले तर कुटुंब अडचणीत येईल.

या सर्व बाबींचा विचार करून जर हिशेब मांडला तर कुणाचा एक कोटी येईल तर कुणाचा दोन कोटी रुपयांचा हिशेब होईल. अतिउच्च जीवनशैलीच्या कुटुंबात हा हिशेब दहा ते वीस कोटींच्या घरात जाईल. मग प्रश्न असा आहे की एवढी रक्कम आपल्या बँकेत नसेल तर करायचे तरी काय? एवढा मोठा निधी अचानक कसा उभा करायचा?

आपल्या कुटुंबासाङ्गी आज बँकेत असायला हवा तो निधी उभारू शकता. आपल्या गरजेपैकी 60 टक्के निधी टर्म विम्याच्या माध्यमातून जेथे प्रीमिअम अत्यंत अत्यल्प असतो व 40 टक्के भाग हा पारंपरिक विम्याच्या माध्यमातून नियोजन करू शकता. म्हणजे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचे काही बरे-वाईट झाले तर दैनंदिन गरजा, शिक्षण व लग्नाचा खर्च, कर्जाची परतफेड व आपल्या होम मिनिस्टरच्या निवृत्तीची रक्कम अशा सर्व गोष्टी सुरक्षित होतील.

हयात असताना पारंपरिक विम्याच्या मॅच्युरिटी व इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या माध्यमातून येणाऱया गरजा भागविल्या जातील.

चला तर मग, आजच दिव्याखालचा अंधार दूर करण्यासाठी आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला किती रक्कम लागणार आहे याचा लेखाजोखा मांडून त्यावर उपाययोजना करू या. म्हणजे कुटुंबाची प्रत्येक दिवाळी आपण हयात असताना किंवा आपण हयात नसताना आनंदानेच साजरी होईल.

– [email protected]