
दिवाळीत आपण जे मंगलमय वातावरण अनुभवतो ते एरवी नाही अनुभवता येत. दिवाळीत ती सकारात्मकता, शांततेचा मंगलमय सूर आपण अनुभवत असतो. मनाला स्पर्श करणाऱया या छोटय़ा छोटय़ा गोष्टीही समाधानाचे माप पदरात टाकतात. तमाची काजळी दूर सारणारे हे समाधान कमालीची उभारी देणारे असते. दिवाळी आणि संगीताचे हे सुरेल नाते मांडत आहेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे.
दि वाळीचं आणि कलेचं आगळं नातं आहे. सूक्ष्म, अव्यक्त असं हे नातं वर्षभर आपण मनात साठवून ठेवतो. मुळातच गायन कला ही शाश्वत आनंद देणारी कला आहे. आपल्या संस्कृतीत जन्मापासून निर्वाणापर्यंत गाणं असतंच. दोन-तीन दशकांपूर्वी दिवाळीमध्ये गायनाची ‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना सुरू झाली आणि आता या संकल्पनेला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतेही संगीत हे मनाला रिझवणारे, आनंद देणारे असते. पहाटेच्या वेळी शास्त्रीय संगीत जास्त ऊर्जा देणारे असते. दिवाळी आणि अभ्यंगस्नानाचे जे महत्त्व आहे तेच देवार्चनेचे आणि संगीताचे. यातूनच ही संकल्पना आली असावी.
मला लहानपणापासून दिवाळीची ओढ आहे. त्यामुळे दिवाळीची तयारी, फराळ, नवीन कपडे, घराची साफसफाई, पुस्तकांची पूजा हे पूर्वी जसं होतं तसं आजही आहेच, पण आता यासोबत एक कलाकार म्हणून दिवाळीशी असलेले नाते हा आनंद द्विगुणित करणारे आहे. दिवाळी हा सण स्वर दीपावली या स्वरूपाने मला साजरा करता येतो. यानिमित्ताने अनेक लोकांना भेटता येतं, त्यांचा सहवास लाभतो. सध्याच्या वातावरणात एक विसावा म्हणून सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणारे हे वातावरण सगळ्यांसाठीच आवश्यक आहे.
गाण्याच्या निमित्ताने मला चांगुलपणा कसा वाटता येईल आणि घेता येईल हे यानिमित्ताने घडते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून माझी कारकीर्द सुरू झाली आहे. यातील ‘खरा तो एकची धर्म’ या गाण्यातली भावना आजही तितकीच गरजेची वाटते. इतकं आता धाकधुकीचे वातावरण आहे. अशा वेळी संगीत, कला, संस्कृती हे आपल्यातील चैतन्य टिकवणारे घटक, ज्यांना आपण जोपासलं पाहिजे. मला जे ज्ञान, संगीत अवगत आहे, ते अशा सकारात्मकतेने रुजवण्यासाठी असावे हा माझा प्रयत्न असतो. आपण संगीताच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण तयार करावे, जे आपल्याला कायम आनंदाचे कवच देईल असं मला वाटतं. माझ्या शास्त्राrय संगीताच्या ‘दिवाळी पहाट’मधून हे आनंदाचे वलय तयार होत असते. हेच दिवाळीचे संगीताशी असलेले नाते आहे.
सणांमध्ये मला हिंदुस्थानात राहायला, इथले वातावरण अनुभवायला फार आवडते. हिंदुस्थानला जी सर आहे ती इतर कुठे नाही हे अगदीच खरे आहे, परंतु याबाबत मी हेही म्हणेन की, हिंदुस्थानबाहेरही इथल्यासारखे, किंबहुना अधिक उत्साहाने हे सण साजरे केले जातात. अगदी पारंपरिक पेहरावात, नटूनथटून तिथे सण साजरे होतात. इथे पारंपरिकता आणि संस्कृती आपल्या आजूबाजूला आहे. तिथे मात्र प्रयत्नपूर्वक ती जपणे, रुजवणे गरजेचं असल्याने हे सांस्कृतिक वातावरण तयार केले जाते. यात जमेची बाजू अशी की, सध्या इथे काही बाबतीत संस्कृती बाजूला सारून जे ओंगळवाणे रूप दिले जात आहे, तेच तिथे परक्या देशात मात्र ही संस्कृती जपण्यासाठीचा अट्टहास दिसून येतो. आपल्या मातृभूमीत जी ऊर्जा आहे ती जपली गेली पाहिजे. जे चांगलं घडत आहे ते जोपासलं पाहिजे. याबाबत माझा अनुभव सांगतो, मागील वर्षी गणपतीत जपानला गेलो होतो. आमच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. इतका की, अगदी एक आठवडा आधी तो हाऊसफुल झाला होता. यात जे जाणवलं ते म्हणजे आपण आपल्या संस्कृतीचा घटक आहोत आणि ती जपण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, यासाठी तिथल्या हिंदुस्थानींनी जे प्रयत्न केले होते ते खरोखरच वाखाणण्याजोगे वाटले. त्याआधी मी युरोपात गेलो होतो. तिथेही अगदी मिरवणुकीपासून रांगोळ्या, सांस्कृतिक पेहराव, पगडी, पोषाख घातलेली मंडळी अगदी दूरदूरवरून खर्च करून आली होती. हे सारं माझ्या गाण्यावर प्रेम आहे इतकंच नव्हतं, तर आपली संस्कृती जपली पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेल्या अनेक उपामांतून जाणवत होता. परक्या देशात फार कमी वेळा अशी संधी, हे वातावरण अनुभवता येते. त्यामुळे ही ओढ त्यांच्या ठायी दिसून येते.
पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जशी दिवाळी असते, अगदी तशीच दिवाळी मी लहानपणी साजरी केली आहे. नव्या कपडय़ांची खरेदी, त्याचं अप्रूप, दिवाळीचा फराळ, ठरावीक फटाके, अभ्यंगस्नान, देवपूजा, किल्ले बनवणं, नातलगांची भेट, फराळाची देवाणघेवाण हे सगळं दिवाळीत असे. जे आजही मला हवंहवंसं वाटतं. ते लोभस दिवस असतात सगळ्यांसाठीच. प्रेम, आपुलकी, नात्यांचं महत्त्व अशा अनेक गोष्टी त्या काळाने मला दिल्या. ज्या आजही मी जपतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून आनंद घेणं आणि देणं हे त्या काळाने मला दिलेलं देणं आहे. स्वरसंगीतातून हा आनंद अधिक कसा देता येईल, निर्माण होईल हा माझा प्रयत्न असतो. माझ्या आयसीएमए फाऊंडेशनद्वारे असे देशविदेशात अनेक सांस्कृतिक कार्पाम राबवले जातात, ज्यायोगे कला आणि संस्कृती बहरली पाहिजे, विस्तारली पाहिजे हा प्रयत्न होतो. हिंदुस्थानबाहेर संगीत पोहोचावं हा उद्देश यानिमित्ताने साध्य होतो याचा आनंद आहे.
सर्वच संस्कृतींतील सणांच्या मुळाशी कला, संस्कृती जोडलेल्या आहेत. म्हणूनच उत्सव, कला, संस्कृती हे आपल्या आनंदाचे निमित्त ठरतात, जगण्याला स्थिरता देतात. दिवाळीत सकाळी आपण जे मंगलमय वातावरण अनुभवतो ते एरवी नाही अनुभवता येत. आपली सकाळ ही नेहमी कामाची, घाईगडबडीची असते. दिवाळीत ती सकारात्मकता, शांततेचा मंगलमय सूर आपण अनुभवत असतो. मनाला स्पर्श करणाऱया या छोटय़ा छोटय़ा गोष्टीही समाधानाचे माप पदरात टाकतात. मनातील तमाची काळजी दूर करत हे समाधान अनुभवणे कमालीची उभारी देणारे असते. आनंदाची हमी देणारे क्षण फार काळ नसतात. म्हणूनच सण-उत्सवांना न अव्हेरता आनंद घेता यायला हवा. फराळाच्या स्वादाच्या रूपात, रोषणाईच्या रूपात तर कधी ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने स्वरांच्या रूपात. आकाश कंदिलाची रोषणाई अन् पणत्यांच्या प्रभावळीने सजलेल्या या उत्सवाचे लोभस रूप तुम्हाआम्हा साऱयांच्या आनंदात सामावलेले आहे. नाद, स्वर, रंग, गंध असं सारं लेऊन आलेला हा दिपावलीचा उत्सव म्हणजे आनंदाचा स्वरसाज आहे.
शब्दांकन : शुभांगी बागडे




























































