
राष्ट्रवादीचा एक गट घेऊन अजित पवार मिंधे सरकारमध्ये सहभागी झाले खरे, पण ऐन दिवाळीत अजितदादा गटात अस्वस्थतेचे फटाके फुटू लागले आहेत. निधी मिळत नसल्याची फुटीर आमदारांची तक्रार आहे. शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना उपमुख्यमंत्री अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याची तक्रार केली होती. आता त्याच अजितदादांवर दिल्लीत गृह मंत्री अमित शहांसमोर रडण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास मिंधे गटाच्या आमदारांनी कडाडून विरोध केला होता. पण त्यांनी आपलं राजकीय काwशल्य पणास लावत अर्थ खात्यासह महत्त्वाची खाती आपल्या गटाच्या पदरात पाडून घेतली. यामुळे मिंधे गट आणि भाजपात कमलाची नाराजी आहे. त्यातच आता मिंधे गट आणि भाजपच्या मंत्र्यांकडून आर्थिक काsंडी होत असल्याने अजितदादा गटाच्या आमदारांची घालमेल वाढू लागली आहे. त्यामुळे तीन तिघाडा कान बिघाडा अशीच काहीशी अवस्था मिंधे सरकारमध्ये सहभागी पक्षांची झाली आहे.
अजित पवार समर्थकांची 21 नोव्हेंबरला बैठक
अजित पवार समर्थक आमदारांची येत्या 21 नोव्हेंबरला देवगिरी बंगला येथे बैठक बोलावण्यात आली आहे. विकास निधी वाटपावरून आमदारांत असलेल्या नाराजीबाबत या वेळी चर्चा होणार असल्याचे समजते.
अजितदादांच्या चेहऱयावर नाराजी दिसते – रोहित पवार
अजितदादांच्या चेहऱयाकडे पाहिल्यानंतर ते नक्कीच नाराज आहेत, असे कुठेतरी दिसते. त्यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. भाजपला लोकनेता कधी पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला, कोणताही लोकनेता पटत नाही. अशा लोकनेत्यांची ताकद भाजपा हळूहळू कमी करतो. तीच गोष्ट भाजपाने अजितदादांच्या बाबतीत केली आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
शिंदेंविरोधात दिल्ली दरबारी तक्रारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समन्वयाने काम करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसची काsंडी करण्याचे राजकारण करतात, अशी थेट तक्रार अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे.
शहांपुढे अजितदादा रडले
दिल्लीला जाऊन अमित शहांकडे तक्रार करता करता अजित पवार रडले. पण त्यांना तक्रारीपुरतं मर्यादित ठेवा, अजितदादा रडून आले, असं कुठेही सांगू नका, असं मला कुणीतरी सांगितलं. अजितदादा कधीच खूश राहत नाहीत. ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले की ते खूश असतात. ‘हम करे सो कायदा’ अशी त्यांची भूमिका असते. सध्याच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटा मिळत नसावा, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी लगावला. पुढील निवडणुकीत ते कमळ चिन्हावर लढतील, असा दावाही त्यांनी केला.
या मंत्र्यांकडून कोंडी
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास आणि सामजिक न्याय या खात्यांबरोबरच मिंधे गट व भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या रोजगार हमी, मृदू आणि जलसंधारण, अल्पसंख्याक, ग्रामविकास खात्यांच्या योजनांसाठीचा आवश्यक निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. मिंधे गट आणि भाजप आमदारांच्या तुलनेत कमी निधी देऊन आपल्या गटाची आर्थिक काsंडी करण्यात येत असल्याचा आरोप अजितदादा समर्थक आमदारांचा आहे.
कार्यक्रमांना अनुपस्थिती
अजित पवार सत्तेत आल्यापासून राज्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र सत्ताधारी पक्षांकडून उभे केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कोणतीही धुसफूस नसल्याचे दावे सातत्याने करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रिमंडळ बैठकीसह अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

























































