
प्रत्येक राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे 100 एमबीबीएस डॉक्टर असावेत, हे गुणोत्तर राखण्यासाठी प्रत्येक राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे 2025-26पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने या गुणोत्तराची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे, नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे त्याचबरोबर मूल्यांकन आणि गुणात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे 2025-26पासून लागू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा वाणीकर यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये देशातील सर्व राज्यांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र यात वाढ करतानाच त्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठीही आयोगाकडून पावले उचलण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































