
आता क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे. दोन्ही संघाचे चाहते आपलाच संघ जिंकणार असे छातीठोकपणे सांगत आहे. तसेच सामन्यातील सर्व मुद्द्यांवर चाहते, जाणकार व तज्ज्ञांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. या सामन्याच्या आधी वर्तवण्यात येणाऱ्या भाकितांचीही जोरदार चर्चा आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी आणि ज्योतिषतज्ज्ञांनीही याबाबतची भाकिते वर्तवली आहेत. त्यातले एक भाकित सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शने तब्बल सहा महिन्यांपूर्वी याबाबत केलेल्या भाकिताची चर्चा होत आहे.
मे महिन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शला विश्वचषक स्पर्धा व अंतिम सामन्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे, असे भाकित वर्तवले होते. त्याचे हे भाकित अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. त्यामुळेच यावेळी त्याने सांगितलेल्या इतर अंदाजांचीही चर्चा होत आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहाता मिचेल मार्शने वर्तवलेले भाकीत उलटच होण्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत.
मार्शन टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल असे म्हटले होते. त्याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिली फलंदाजी करताना फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात 450 धावा फटकावेल असेही तो म्हणाला होता. त्या धावसंख्येचा पाठलाग करत टीम इंडिया 65 धावांवर सर्वबाद होईल आणि ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत विश्वचषक जिंकेल, असे भाकीत मार्शने केले होते.
आतापर्यंतच्या दोन्ही संघांची कामगिरी पाहता हे भाकित उलट सिद्ध होण्याची शक्यताच सध्या अधिक असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाऐवजी टीम इंडिया यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजेय राहिला आहे. तसेच टीम इंडियाने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला आहे. शिवाय टीम इंडियातील फलंदाजांची व गोलंदाजांची कामगिरी उत्तम आहे. टीम इंडियाच्या 2 बाद 450 धावा व ऑस्ट्रेलिया 65 वर सर्वबाद होण्याची शक्यता अधिक असल्याचे चाहते सोशल मीडियावर सांगत आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.























































