विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी, 5 लाख भाविकांच्या उपस्थितीत ‘कार्तिकी’ साजरी,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे

तुझे दर्शन झाले आता!

तू सकल जणांचा दाता!!

घे कुशीत गा माउली!

तुझ्या पायरी ठेवतो माथा!!

असा भाव मनी आळवित कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी आलेल्या लाखो वैष्णवांनी पवित्र चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा पूर्ण करून परंपरागत वारी पोहचती केली. या अनुपम सोहळ्याला पाच लाखांहून अधिक वारकऱयांनी उपस्थिती लावल्याने विठुरायाची नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. एकादशीच्या पर्वणीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे पददर्शन घेण्यासाठी भाविकांनी दर्शन रांगेत प्रचंड गर्दी केली. रांग गोपाळपूर रोडपर्यंत गेली होती. त्यामुळे दर्शनासाठी 15 तासांहून अधिकचा वेळ लागत होता.

कार्तिकी यात्रा एकादशीच्या यात्रेसाठी मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. एकादशीला लाखो भाविकांचा जनसागर चंद्रभागा स्नान करण्यासाठी चंद्रभागा वाळवंटात भल्या पहाटे लोटला होता. भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच दर्शन रांगेत दीड लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरमध्ये दाखल झाली होती.

विठू-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर भाविक प्रसाद, कुंकूबुक्का, तुळशीमाळ, विठू-रखुमाईच्या मूर्ती-फोटो खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. प्रासादिक साहित्यांची विक्री मोठय़ा प्रमाणावर झाली. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कार्तिकी यात्रेकरिता विशेष रेल्वेगाडय़ा व एसटी बसगाडय़ा पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. एसटी बसेसने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंदिर विकास आराखडय़ाच्या 26 कोटींच्या कामाचा शुभारंभ

– महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. ‘बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी, समाधानी ठेव, शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव, समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा,’ असे साकडे फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय महापूजेनंतर मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या विविध संवर्धन विकासकामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.

दिंडोरीतील घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी

– नाशिक जिह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस, मानाचे वारकरी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

भक्तिसागर येथे दीड लाख भाविक वास्तव्यास

– चंद्रभागेच्या पैलतीरी असलेल्या भक्तिसागर 65 एकर येथे सुमारे दीड लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथे वास्तव्य करणाऱया भाविकांसाठी वीज, पाणी, शौचालये, प्रथमोचार केंद्र तसेच पोलीस सेवा पुरवण्यात आली आहे. तंबू, राहुटय़ांमधून भजन, कीर्तन, प्रवचनाच्या सुरू असलेल्या जागरानेही भाविक भक्तीत दंग झाले आहेत.

पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेस प्रारंभ

भागवत धर्माचे प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची 753वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 727 वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या 554व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे 2,100 किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेस श्री विठ्ठलनामाच्या जयघोषात आज प्रारंभ झाला.

भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली असून शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत. या यात्रेचे आज पंढरपूर येथून प्रस्थान झाले.

प्रस्थान पूजा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर व त्यांच्या पत्नी सीमा नेवासकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, रविअण्णा राहणे, अजिंक्य शिंदे, अतुल मानकर, पंकज सुत्रावे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, ऍड. विलास काटे, मनोज मांढरे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते. आज हा सोहळा अरण, कुर्डुवाडी, म्हैसगाव मार्गे बार्शी मुक्कामी पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र घुमान येथे पोचणार आहे.