
अनेक रंगांची, आकारांची फळे असतात. काही फळांचा वापर औषध म्हणून होतो, तर काही फळे त्यांच्या अप्रतिम चवीसाठी खाल्ली जातात. आपल्याला लाल रंगाचे सफरचंद माहीत आहे, पण काळसर गडद जांभळय़ा रंगाचे सफरचंद तुम्ही कधी बघितलेय का? अशाच ब्लॅक डायमंड फळाची सध्या चर्चा आहे. कारण हे एक सफरचंद तब्बल 500 रुपयांना विकले जात आहे.
जगभरात सफरचंदाचे 100 हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ब्लॅक डायमंड सफरचंद. हे दुर्मीळ फळ असून सहसा पिकत नाही. काळे गडद वांगी रंगाचे हे फळ तिबेटच्या न्यिंगची पर्वतरांगांमध्ये आढळते. याची लागवड साधारणपणे समुद्रसपाटीपासून खूप उंचावर पर्वतांवर होते. असे म्हणतात की, दिवसा या फळावर अल्ट्रावायलेट किरणे पडतात, त्यामुळे याचा रंग गडद जांभळा असतो. याच्या सुंदर आकारामुळे, सुंदर रंगामुळे आणि आंबट-गोड चवीने या फळाला एक महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच एका डायमंड सफरचंदाची किंमत 500 रुपयांहून अधिक आहे.


























































