
>> विनायक
लाकूडफाटय़ावर जळणारी तीन दगडांची चूल, नंतर रॉकेलच्या शोधानंतर ‘फरफऱया’ किंवा वातीचा स्टोव्ह, त्यानंतर आलेला एलपीजी स्वयंपाकाचा ‘गॅस’ आणि त्याहीपुढे जाऊन इलेक्ट्रिकची म्हणजे विजेवर चालणारी ‘हॉटप्लेट’ ते ‘इंडक्शन प्लेट’ अशा अनेक ‘चुलीं’च्या प्रकारातील आता शहरी भागात तरी अनेक स्वयंपाकघरांत पोचलेला ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ हे वेगळय़ाच तत्त्वावर चालणारं उपकरण कधीपासून अस्तित्वात आलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचं व्यावहारिक रूप मॅक्सवेल यांनी समीकरणातून सिद्ध केल्यावर त्याची अनेक प्रकारची उपयुक्तता समोर येऊ लागली. अगदी ‘रॉकेट सायन्स’साठी निर्मिलेले कमी वजनाचे चपटे कॉम्प्युटर अनेक हातांत ‘लॅपटॉप’ होऊन पोचले. एका गोष्टीसाठी उद्युक्त होऊन झालेलं संशोधन कालांतराने सर्वंकष रूप घेतं. हळूहळू ते सर्वसामान्यांच्या घरापर्यंतही येऊ शकतं. एकेकाळी अगदी सामान्य क्षमतेच्या कॉम्प्युटरसाठी एखाद्या मोठय़ा कार्यालयाएवढी जागा लागत होती. आता त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक क्षमतेचे कॉम्प्युटर फारच कमी वजनाचे आणि अगदी ‘पामटॉप’ किंवा हाताच्या तळव्यावर मावतील इतक्या आकारात आले आहेत. आजकाल सर्वत्र उपलब्ध असलेला ‘इंडक्शन स्टोव्ह’चा पर्याय बरेच जण स्वीकारतात. गॅस कनेक्शन घेणं अनेक, फिरतीची कामं पिंवा नोकरी करणाऱयांना सहज जमत नाही. एका जागी स्थिर काम नसेल तर इंडक्शन स्टोव्ह एखाद्या चौकोनी पेटीसारखा कुठेही नेता येतो आणि जिथे विजेचा पुरवठा किंवा अगदी ‘इन्व्हर्टर’ने साठवलेला वीज पुरवठा असेल तिथेही तो वापरता येतो. इंडक्शन हीटिंग म्हणजे पूर्वी साध्या ‘कॉइल’ची विजेची शेगडी मिळायची त्याचा आधुनिक अवतार. या कॉइलवर काही पदार्थ सांडण्याचा किंवा उतू जाण्याचा धोका असायचा. शिवाय ‘शॉक’ लागण्याची धास्ती होतीच. मग हॉटप्लेट आल्या. पृष्ठभाग झाकून खाली कॉइल अशा प्रकारे त्यातून सुरक्षितता वाढली. त्यानंतर आली ती सध्याची इंडक्शन शेगडी, त्याला इंडक्शन हॉब किंवा इंडक्शन कुकरटॉप असंही म्हणतात. याचा इतिहास पार 1900 पर्यंत जातो, इंडक्शन कुकरमधली पृष्ठभागाखाली दडलेली तांब्याची कॉइल विजेच्या प्रवाहाने मॅग्नेटिक करन्ट संपूर्ण कुपिंग पॅनमध्ये (तवा) पोचवते आणि तो तापतो. त्यावर सपाट तळ असलेलीच भांडी किंवा तवा टोप (पातेले) ठेवावे लागते. तरच त्या भांडय़ात सर्वत्र समान उष्ण ऊर्जा पसरू शकते. यावरील रांधण्याची प्रक्रिया 70 टक्क्यांहून अधिक प्रभावी होते. आता या प्रकारचे ‘स्टोव्ह’ (शेगडय़ा) आकर्षक आकारात मिळतात.
दुसरा प्रकार मायक्रोवेव्ह ओव्हन. यामागे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे (विद्युत चुंबकीय प्रारण) कार्य करते. अन्न शिजवण्याच्या इतर सर्व प्रकारांत ते ‘बाहेरून आत’ या पद्धतीमध्ये शिजतात. त्यामुळे काही वेळा भात-भाजी- मटन अंतर्भागात कच्चं राहू शकतं. मायक्रोवेव्ह कुकिंगमध्ये ‘इनसाइड आऊट’ म्हणजे ‘आतून बाहेर’ या पद्धतीने अन्न शिजण्याची प्रक्रिया घडते. दुसऱया महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये जॉन रेन्डॉल आणि हॅरी बूट यानी पॅव्हिटी मॅग्नेट्रोनचा शोध लावल्यानंतर सूक्ष्म अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रवाहाला (करंट) चालना मिळाली. अमेरिकेत याच सुमारास पर्सी स्पेन्सर यांनी मायक्रोवेव्ह कुपिंगचा शोध लावला असं म्हटलं जातं.
याचा वापर बहुधा ‘रिहीटिंग’ म्हणजे आधी गॅसवर वगैरे शिजवलेले अन्न नंतर पुन्हा गरम करण्यासाठी होतो. तसे ‘मायक्रोवेव्ह’मध्येच बनवल्या जाणाऱया खास खाद्यपदार्थांच्या ‘रेसिपी’ आहेतच, परंतु त्याचा रोजचा वापर मुख्यत्वे अन्न परत गरम करण्यासाठी होताना दिसतो. या कुकरच्या ‘भिंती’मधून येणारी ऊर्जा मध्ये ठेवलेल्या काचेच्या फिरत्या तबकडीवरच्या काचेच्या भांडय़ातील अन्नाला सर्वत्र सारखी मिळते आणि काही सेपंदांतच अन्न गरम होते.























































