
समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीसाठी आज दुपारी 3 वाजता मुळा धरणाच्या 11 मोऱयांचे गेट 5 इंचापर्यंत उचलून 4 हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातून नदीपात्रात सोडले जाणाऱया पाण्यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याने आज सकाळपासूनच मुळा धरणावर नागरिकांची गर्दी झाली होती.
भंडारदरा व दारणातून सोडलेल्या पाण्याबरोबरच मुळा धरणातून जायकवाडीला पाणी जाण्याच्या उद्देशाने दुपारी तीनचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. धरणावरील चार, आठ, सहा, पाच, सात या वक्रद्वाराची कळ दाबताच धरणातून मुळा नदीपात्रात 4 हजार क्युसेकने पाणी झेपावले. रविवारी रात्री विसर्ग वाढविण्यात येणार आहे. रविवारी दुपारी मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाची 22 हजार 600 दशलक्ष घनफूट नोंद होती. यावेळी मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, विलास पाटील, जायकवाडी विभागाचे ए. एच. गोकुळे, डी. एस. जवकर, गो. नी. जाधव, राहुरी पाटबंधारे विभागाचे राजेंद्र पारखे, शाखाधिकारी बी. बी. घोरपडे, सलिम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आय्युब शेख, दिलीप कुलकर्णी उपस्थित होते.
मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरक्षिततेसाठी नदीपात्रातील चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले.
बंधाऱयांच्या फळय़ा हटविल्या
जायकवाडीसाठी मुळा धरणातून सोडलेल्या पाण्याचा मार्ग सुखकर होण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुळा नदीपात्रातील मानोरी, मांजरी, वांजुळपोई या पाणी साठवण बंधाऱयांच्या फळ्या, तर रविवारी सकाळी डिग्रस बंधाऱयावरील फळ्या हटविण्यात आल्या.
मुळा धरण, बंधाऱयांवर बंदोबस्त
मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुळा धरण आणि नदीवरील बंधाऱयांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जायकवाडीला सोडलेल्या पाण्याबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.
निळवंडे, भंडारदऱयातूनही पाणी
निळवंडे धरणातून शुक्रवारी रात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज यामध्ये वाढ करून तो 3 हजार क्युसेक करण्यात आला. तर रविवारी सकाळी भंडारदरा धरणाच्या सांडव्याशेजारील वक्राकार दरवाजातून स्पिलवेमधून 7228, पावर हाऊससाठी 820 असे 8 हजार 48 क्युसेकने प्रवरापात्रात विसर्ग देण्यात येत आहे. हे पाणी पुढे निळवंडे धरणात झेपावत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या विसर्गातील पाणी रविवारी पहाटे अकोल्यात पोहचले. या आवर्तनामुळे प्रवरा नदीपात्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात गोदावरी धरण समूहातून एकूण 8.60 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यापैकी मुळा व प्रवरानदी धरण समूहातून 5.46 टीएमसी सोडण्यात येणार आहे. यापैकी अकोले तालुक्यातील निळवंडे व भंडारदऱयातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे पाणी संगमनेर तालुक्यातील ओझर जलाशयात पोहचण्यास किमान 20 तास लागतील. ते लवकर पोहचावे म्हणून प्रत्येक 3 ते 5 तासांनंतर विसर्गात किमान 2 ते 3 हजार क्युसेक वाढ होईल, अशी माहीती भंडारदरा धरणाचे सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.




























































