मुलाखत घेताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)

एक वक्ता म्हणून आपल्याला जसे उत्तम बोलणे महत्त्वाचे असते तसेच दुसऱयाला बोलते करणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. ही कला ज्याला अवगत असते त्या व्यक्तीला एक उत्तम मुलाखतकार होता येते. मुलाखती घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आज आपण समजून घेऊ.

मुलाखत ही सामान्यतः दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये घेतली जाते. मुलाखत घेत असताना मुलाखत घेणाऱया व्यक्तीने मुलाखत देणाऱया व्यक्तीचा आणि त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या व्यक्तीला मुलाखतीपूर्वी अपेक्षित प्रश्नांवर चर्चा करून त्याचे त्याविषयीचे मत जाणून घेतल्यास जेव्हा जाहीर मुलाखत घेतली जाते, तेव्हा त्याचे चुकीचे पडसाद उमटणार नाहीत याची खात्री उभय पक्षांना करता येते.

मुलाखत घेत असताना उत्तर देणाऱयाने 75 टक्के आणि मुलाखत घेणाऱयाने 25 टक्के बोलायला हवे. प्रश्नांची सुसूत्रता आणि मुद्देसूदपणा हा मुलाखतकाराचा एक महत्त्वाचा गुण आहे.

समोरचा उत्तर देत असताना आपण त्याला मध्येच थांबवून अडथळा निर्माण करता कामा नये. याउलट त्याला अपेक्षित वेळेत बोलण्यासाठी प्रवृत्त करता यायला हवे आणि जर वक्त्याने अपेक्षित वेळेचे उल्लंघन केले तर त्याला योग्य पद्धतीत थांबवतादेखील यायला हवे.

एखाद्याला बोलते करणे तसे सोपे आहे, पण बोलत असणाऱया व्यक्तीला योग्य जागी थांबवणे ही एक कठीण कला आहे आणि वेळ मर्यादा सांभाळण्यासाठी ही कला मुलाखतकाराला जमायलाच हवी. कधी कधी थेट शब्दांनी न थांबवता आपल्या देहबोलीच्या आधारे आपण समोरच्याला वेळ मर्यादेचे भान नक्कीच करून देऊ शकतो.

काही मुलाखती या पूर्वनियोजित असतात, तर काही मुलाखती या तितक्याशा नियोजित नसतात. पण एक उत्तम मुलाखत करण्यासाठी त्याचे पूर्वनियोजन केलेले नेहमीच चांगले.

मुलाखत घेणाऱया आणि देणाऱया या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले असतील तर ती मुलाखत सहज यशस्वी होते. मुलाखत देणाऱयाचा तज्ञ विषय जाणून घेऊन त्याला कोणत्या गोष्टींवरती मार्गदर्शन करायला जास्त आवडेल याविषयी मुलाखतकाराने  जाणून घ्यायला हवे, जेणेकरून तो त्या पद्धतीचे समर्पक प्रश्न विचारेल.

योग्य जागी योग्य प्रश्न विचारणे, विचारांची श्रोत्यांच्या अपेक्षेनुसार देवाणघेवाण करणे आणि अपेक्षित प्रश्नांच्या  माध्यमातून श्रोत्यांना त्यांचे उत्तर मिळवून देणे हा मुलाखतीचा खरा गाभा असतो. मुलाखत घेणे ही एक उत्तम कला आहे. योग्य सरावाने आपल्याला एक उत्तम मुलाखतकार होता येते.