
>>लता गुठे
आपण रोज जर उघडय़ा डोळ्यांनी जगाकडे पाहिलं की, अनेक घटना, प्रसंग आजूबाजूला घडताना दिसतात. काही मनाला सुखावतात, तर काही मनाला व्याकूळ करतात. कधी कधी सर्जनशील मनाला वेदना होतात, परंतु आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही हा सल कुठेतरी टोचतो, बोचतो… आणि मग त्याच्याच कविता, कथा होतात.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. रविवारचा दिवस. रविवारी सकाळी उठण्यापासून सर्व सावकाश चाललेलं असतं. आरामात उठायचं, मग कॉफी किंवा चहा घ्यायचा आणि मग थोडी स्फूर्ती आली की, चालण्यासाठी मनाला तयार करायचं.
तयार होऊन घराबाहेर पडले. लिफ्टमध्येच पाचव्या माळ्यावरची सविता आणि तिची पाच-सहा वर्षांची मुलगी दिशा भेटली. आजकाल बिल्डिंगमधल्या लोकांच्या लिफ्टमध्येच भेटी होतात. तेवढंच काय ते भेटणं आणि बोलणं होतं. एरवी ना कोणाकडे जाणं ना येणं. आपल्या कामात बिझी आणि घराची दारं कायमची बंद. अशा वेळेला लिफ्टमध्ये भेटलं तरी किती अप्रूप वाटतं. दिशाकडे पाहिलं आणि ती मोठी झाल्याचं जाणवलं. म्हणजे बऱयाच दिवसांनंतर आम्ही भेटत होतो. ‘हाय हॅलो’ करेपर्यंत लिफ्ट ग्राऊंडला पोहोचली. दिशा पटकन लिफ्टमधून बाहेर पडली अन् घाईगडबडीत चालू लागली. ओल्या फरशीवरून दिशाचा पाय घसरला आणि ती खाली आपटली. त्या वेळेला सविताची रिअॅक्शन, काळजी हे सर्व पाहून मला आजकालच्या पालकांच्या अति प्रोटेक्शनमुळे मुलांची वाढ खुंटते की काय? असं कायम वाटू लागतं. आमच्या वेळेला कितीही पडलं, लागलं, जखमा झाल्या तरी आईवडील त्याचा कधीही बाऊ करत नसत. त्यामुळे आम्ही पडलो, उठलो, लागलेल्या जागी आम्हीच फुंकर घालून सावरायला शिकलो, हा विचार माझ्या नकळत मनात रेंगाळून गेला. मी माझ्या रस्त्याने चालू लागले. पालक मुलांच्या बोटाला पकडून चालतात तरीही मुलं धडपडतात, पडतात आणि त्या गोष्टीचं आई-वडिलांना फार वाईट वाटतं. बरेच पालक मुलांना नको तेवढे प्रोटेक्शन देतात. त्यामुळे मुलं नको त्या गोष्टीचा बाऊ करून भोकाड पसरतात हे आपण नेहमीच पाहतो. दिशाकडे पाहिलं आणि मला तीन-चार दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
आपण रोज जर उघडय़ा डोळ्यांनी जगाकडे पाहिलं की, अनेक घटना, प्रसंग आजूबाजूला घडताना दिसतात. काही मनाला सुखावतात, तर काही मनाला व्याकुळ करतात. अशा वेळेला कधीतरी कुठेतरी वाचलेल्या कवितेच्या ओळी आठवतात. कारण ते शब्द म्हणजे आपण पाहिलेल्या घटनेचे, प्रसंगाचे हुबेहूब वर्णन असते…
धूप छांव का खेल है,
सुख दुख का मेल है।
मन मन में ही हंसता है,
दिल चुपके से रोता है।
असेच अनेक प्रसंग ऊनसावलीचा खेळ खेळत समोर येतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. डोळ्यांच्या समोर घडणाऱया घटना आयुष्यातील चढ-उतार पार करताना येणारे अनुभव, पडणारे प्रश्न बऱयाचदा मनाला कुरतडत राहतात. काही प्रसंग जगायचं कसं शिकवून जातात. म्हणूनच मला नेहमी वाटतं, जीवन हीच खरी कार्यशाळा आहे. नुकताच पाहिलेला एक प्रसंग उदाहरणादाखल सांगते…
दोन-चार दिवसांपूर्वीची घटना. सकाळी चालायला उतरले. आजूबाजूची झाडं, नवीन होणारे टॉवर्स, रस्त्यावरचे खड्डे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तोडलेल्या झाडांच्या फांद्यांचे रस्त्याच्या बाजूने साचलेले ढीग आणि जाणारी-येणारी वाहनं या सगळ्यांचे निरीक्षण करत स्वतला सावरत पुढे जाऊ लागले. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर नेहरू रोडवर मला एक खेळ दिसला आणि जागेवरच माझी पावलं खिळली. चार-पाच दिवस लोटले तरी ती पोरगी काही डोळ्यांसमोरून जाईना. चार-पाच वर्षांची कोवळी पोरगी दोरीवर कसरती करत होती. दोन बाजूला बांबू बांधले होते आणि त्या बांबूवर एक जाडशी दोरी ताणून बांधली होती. बाजूला एका मोबाइलवर गाणं वाजत होतं…
कुछ खोना है कुछ पाना है
जीवन का खेल पुराना है!
या गाण्याचे स्वर आणि समोर दिसणारं त्या मुलीचं चित्र हे एकमेकांत मिसळलं. कारण त्या पोरीची समोर एका ठिकाणी स्थिर झालेली नजर आणि गाण्यावर एकरूप झालेले तिचे कान. मी बराच वेळ तिचं निरीक्षण केलं. त्या वेळेला असं लक्षात आलं की, तिची एकाग्रता किती जबरदस्त आहे. तिचं लक्ष आजूबाजूच्या कुठल्याच घटनेवर नव्हतं. ते होतं फक्त तिच्या दोरीवरच्या पावलांवर. एक छोटा बांबू दोन्ही हातांत आडवा धरलेला आणि इतक्या कुशलतेने मागेपुढे पाय घेऊन ती त्या दोरावर झोके घेत होती. डोक्यावर एक छोटंसं मडक्याच्या आकाराचं काहीतरी बांधलेलं होतं. या सर्व गोष्टी ती करत असलेल्या हालचालींशी एकरूप झाल्या होत्या.
बाजूला मळकटलेली उघडीनागडी पाच-सहा मुलं मस्त मजेत खेळत होती. जवळच एक कटोरा ठेवला होता. येणारे जाणारे त्यामध्ये दहा-पाच रुपये टाकत होते. खाली उभी होती तिची आई. सात-आठ महिन्यांची गरोदर असलेली. तिच्या चेहऱयावर कसलेच भाव नव्हते. ती फक्त पाहत होती येणाऱया-जाणाऱयाकडे आणि त्या कटोऱयामध्ये कोणी किती पैसे टाकले आहेत ते! त्या वेळेला माझ्या मनात एक विचार आला, तिचा बॅलन्स गेला तर ती धाडकन खाली पडेल. या विचारानेच काळजाचा ठोका चुकला. तोवर तिचे दोन-चार फोटो काढले आणि त्या कटोऱयामध्ये दहा रुपयांची नोट टाकून पुढे चालायला निघाले.
चार-पाच दिवस या प्रसंगाने मला अस्वस्थ केलं. त्यांचं उघडय़ावरचं जगणं आणि आमचं टॉवरमधल्या माणसांचं जगणं यामध्ये किती मोठी दरी होती. श्रीमंत लोकांचे मोठे टॉवर, पैसा अमाप, पण मूल एखादं असतं किंवा नसतं. सर्वच लक्ष सोयीसुविधांकडे, परंतु उघडय़ावरचं जित्याजागत्या माणसांचं जगणं हे कुत्र्यामांजरांच्या जगण्यापेक्षा काही फारसं वेगळं नसतं. ना कुठली स्वप्नं ना उद्याची चिंता. मुलं जन्माला घालायची आणि भीक मागायला सोडायची. अशा कोवळ्या लेकरांकडून कसरती करून घ्यायच्या आणि पोटाची खळगी भरायची. हे सगळं पाहून आपल्या सर्जनशील मनाला वेदना होतात, परंतु आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही ही सल कुठेतरी टोचते, बोचते… आणि मग त्याच्याच कविता, कथा होतात.
आज तिच्यावरच काहीतरी लिहावंसं वाटलं. कारण तिचे फोटो मोबाइलमध्ये दिसले आणि कवितेच्या ओळी सहज मनात घोळू लागल्या…
अजब तो खेळ
अन् अजब तिची अदा
ना भीतीचा लवलेश
चेहऱयावर दिसला साधा
कोण येतो कोण जातो
नसे तिला देणेघेणे
ठाऊक तिला एवढेच की
नजर लक्ष्याकडे ठेवणे
दोरीवर उभी राहुनी
काठी घेऊनी हाती
सात वर्षांची कोवळी पोर
कसरती करत होती
पाहून त्या चिमुकलीला
काळजाचा चुकला ठोका
मागेपुढे पाय हलवून
घेई ती सहज झोका
पोटाची खळगी भरण्यासाठी
तिला जिवाची पर्वा नाही
परंतु मला त्या मुलीकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ती अशी. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपलं सारं लक्ष आपल्या ध्येयावर असायला पाहिजे. या प्रसंगाला रस्त्यावरचा एक नियम आपण नेहमी वाचतो – ‘नजर हटी दुर्घटना घटी’- तो किती चपखलपणे लागू पडतो.
(लेखिका संपादिका, प्रकाशक आहेत.)





























































