लाचप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकाला अटक, सहायक पोलीस आयुक्ताचाही सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका व्यक्तीकडून दोन लाखांची मागणी करून एक लाखावर तडजोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली.

प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रजपूतने एका व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. पथकाने या घटनेची पडताळणी केली असता रजपूत याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष गणेश कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला अटक केली. रजपूतकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि विद्यमान सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्यासाठी लाच स्वीकारत असल्याचे कबूल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ड्रग्ज प्रकरणानंतर लाच खोरीच्या प्रकरणामुळे सोलापूर पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे येणाऱया काळात सोलापुरातील जनतेसमोर चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. पोलीस दल येणाऱया काळात किती सक्षमपणे काम करते हे दिसून येईल.