
वडिलांची बाईक त्यांना न सांगता गुपचूप नेणाऱ्या नवतरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण 18 वर्षांचा असून त्याने वडिलांना न सांगता फेरफटका मारण्यासाठी बाईक नेली होती. मुंबईतील विक्रोळी येथील प्रबोधनकर ठाकरे ब्रीजवर त्याचा अपघात झाला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव हितेंद्र विजय तिवारी असून विक्रोळीच्या पार्क साईट भागात तो राहत होता. हितेंद्रच्या वडिलांनी कामावरुन घरी येण्याजाण्यासाठी दुचाकी खरेदी केली होती. वडिलांचा डोळा चुकवत हितेंद्र दुचाकी घेऊन गेला, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नागी. पोलिसांनी सांगितले की, “राजावाडी रुग्णालयातून आम्हाला अपघाताबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली तेव्हा ओला ड्राईव्हर इमरान सिद्दीकी आणि प्रवासी सुनिता मिराणी तिथे उपस्थित होत्या.”
पोलिसांना इम्रानने दिलेल्या माहितीनुसार, “25 नोव्हेंबरला, दुपारच्या सुमारास इम्रान पवईहून भांडूपच्या एलबीएस रोडच्या दिशेने जात होता. त्यावेळी हितेंद्र त्याला ओव्हरटेक करण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. जेव्हा तो ओव्हरटेक करण्यात यशस्वी झाला तेव्हा त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट डिवाईडरवर जाऊन आदळला. हितेंद्र रस्त्याच्या पलिकडे खाली पडला तर त्याची दुचाकी दुभाजकावर अडकली. घटनेचे गांभीर्य पाहता इम्रान आणि सुनिता यांनी हिंतेद्रला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी हितेंद्रवर उपचार करायचा प्रयत्न केला मात्र ते त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी हितेंद्रचे वडील विजय यांच्या नावावर होती. नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या हितेंद्रकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नव्हता. तसेच, त्याने गाडी चालवताना हेल्मेटही घातले नव्हते. त्यामुळे अपघातात त्याच्या डोक्याला जबर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी स्वत:हून गुन्हा दाखल करुन घेतला असून हितेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चालवण्यासाठी वैध परवाना नसणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, निष्काळजीपणामुळे (स्वत:च्या) मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































