अतरंगी अन्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मोने

अन्या माझ्यापेक्षा वयाने साधारण एका पिढीच्या अंतरावर. नाकासमोर चालणारं असं त्याचं कुटुंब. पण अन्या मात्र त्याच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला दर्शवण्यात पुढे. अश साध्यासरळ घरात अन्यासारखं व्यक्तिमत्व जन्माला येणं म्हणजे नियतीचा अतर्क्य खेळच होता. त्याचं अचाट वागणं हे त्याच्या काय, सगळय़ांच्याच आकलनाबाहेरचं. तो असा का वागतो ते कोणालाही, कुठलाही तर्क लावून सांगता येणार नाही. पार लहानपणापासून तो असाच होता आणि आहे.

अ न्या ऊर्फ अनिल हा माझ्यापेक्षा वयाने साधारण एका पिढीच्या अंतरावर. म्हणजे आता तो आहे पन्नासच्या आसपास, पण सातत्याने, अगदी नियमित केस काळे करतो, नवनवीन तरुणांच्या अंगावर शोभतील असे कपडे घालतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी म्हणजे चाळीस-बिळीस वर्षांचा असताना तो बिनदिक्कत आपलं वय पंचवीस असं सांगायचा. मग पुढे ते आधारकार्ड वगैरे आल्यामुळे त्याचे बिंग उघडकीला आलं. असो. मुद्दा त्याच्या वयाचा नाही, कधीच नव्हता.आजच्या लेखात त्याला ‘अन्या अतरंगी’ का म्हणतात ते सांगायचं आहे.

अन्याच्या घरात, तो घरातल्या इतर सगळय़ांपेक्षा वेगळाच आहे. वडील सरकारी नोकरीत. नाकासमोर चालण्यात संपूर्ण आयुष्य गेलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी जितकी वर्षे नोकरी केली त्यापेक्षा अधिक वर्षे निवृतीवेतन भोगलं. आई शाळेत शिक्षिका. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाली. तीही निवृत्तीवेतन उपभोगते आहे. सर्वसामान्य इतर लोकांप्रमाणे आयुष्य जगल्यामुळे आणि व्यवस्थित पदोन्नती मिळवल्यामुळे दोघांना मिळून महिना लाखभर रुपये निवृत्तीवेतन मिळतं. पहिल्यापासून दोघांच्याही गरजा अगदी साध्या. वडील दोन वर्षांनंतर एकदा तीन कपडय़ांचे जोड शिवून घेतात. आईसुद्धा तशीच. घरातले सगळे शाकाहारी, म्हणजे अन्याचा मोठा भाऊ आणि धाकटी बहीण. तिला लग्न करायचं नाहीये. भाऊ उत्तम नोकरी करतो. त्याची बायको गुजराती, त्यात जैन म्हणजे घर शाकाहारी. म्हणजेच महिन्याचा खर्च अगदी आटोक्यात, आटोपशीर. या अशा घरात अन्या जन्माला आला. त्याचा अशा घरात जन्म होणं म्हणजे नियतीचा अतर्क्य खेळ. त्याचं अचाट वागणं हे त्याच्या काय, सगळय़ांच्याच आकलना बाहेरचं. तो असा का वागतो ते कोणालाही, कुठलाही तर्क लावून सांगता येणार नाही. पार लहानपणापासून तो असाच होता आणि आहे. शाळेत असताना, म्हणजे पाचवीत वगैरे असताना अचानक भर श्रावणात अन्या संध्याकाळी शाळेतून घरी आला. सगळी भावंडं एकाच शाळेत होती मराठी माध्यमात, पण त्यामुळे घरी रोज प्रार्थना, परवाचा आणि इतर स्तोत्र वगैरेंचं पठण असायचं. मारुती स्तोत्र म्हणून झाल्यावर त्याने वडिलांना एक प्रश्न विचारला…
“बाबा! रामरक्षेत वानर युथ मुख्य असं लिहिलंय. म्हणजे हनुमान तरुण वानरांचा नेता होता का?”
वडील रागाने आणि त्याहीपेक्षा खेदाने, निरुत्तर होऊन गप्प झाले. फक्त तिथून पुढे अन्या शाळेतून घरी यायच्या आत भावंडे रामरक्षा म्हणून घ्यायला लागली. अन्या तसा खूप हुशार होता. मराठी माध्यमात शिकल्याने, वैचारिक गुलामी म्हणून पुढे आपल्याला इंग्रजी भाषेत शिकावं लागणार हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याची भावंडंही शिकत होती, पण इंग्रजी बोलायची वेळ आली की ते चाचरत चाचरत बोलायची. अन्याच्या लीला शाळेपासूनच दिसत होत्या. त्याच्या वर्गात जानेकर नावाचा मुलगा होता. त्याची चित्रकला फार छान होती. एकदा त्याने अब्राहम लिंकन यांचं अप्रतिम चित्र काढलं होतं. सगळय़ांनी त्याची प्रशंसा केली. ते चित्र काचेच्या आवरणात घालून शाळेच्या मुख्य सूचना फलकाजवळ ठेवायचं असं मुख्याध्यापकांनी ठरवलं. त्याआधी दोन दिवस ते नुसतंच बाहेर ठेवलं होतं. अन्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो काळय़ा रंगाचा कुंचला लपवून घेऊन सकाळी शाळेत हजर झाला. चित्राजवळ जाऊन त्याने कुंचला वापरला. सकाळी कोणाचं तरी लक्ष गेलं. बघतात तो काय? लिंकन यांच्या बुबुळाजवळचा काळा रंग थोडासा ओला होता आणि त्यांचे डोळे पूर्ण तिरळे दिसत होते. खूप चौकशी केली गेली, पण हे कृत्य कुणी केलं ते कुणालाच कळलं नाही. अन्या करून नामानिराळा झाला. असाच एकदा तो परीक्षेचा पेपर सोडवत होता आणि लपवलेल्या कागदात बघत होता आणि पेपर लिहीत होता. पर्यवेक्षकांची नजर त्यावर पडली, पण त्यांनी काहीच न करता अन्याला पूर्ण पेपर करू दिला आणि संपता क्षणी त्याच्यावर अक्षरश झडप घातली आणि कागद हस्तगत केला. आपण कॉपी करताना एकाला पकडला याचा आसुरी आनंद त्यांच्या चेहऱयावर दिसत होता.
“अन्या! कॉपी करत होतास ना?”
“नाही सर! शप्पथ! मला सगळं येतंय. कशाला करू कॉपी?” निर्विकार चेहऱयांनी तो म्हणाला.
“खिशातला कागद काढ!” पर्यवेक्षकांनी फर्मावलं.
अन्याने शांतपणे खिशातला कागद काढून दिला. तो वाचून पर्यवेक्षक गोंधळलेले दिसले. त्याला हाताला धरून ते मुख्याध्यापकांच्या कचेरीत गेले.
“सर! हे बघा! अन्या कॉपी करत होता.”
मुख्याध्यापकांनी कागद बघितला.
“या तर बातम्या आहेत.”
“हो सर! अक्षर सुधारावं म्हणून मी रोज बातम्या लिहून काढतो.” अन्या पुन्हा निर्विकार!
“अरे! पण पेपर लिहिताना काय बघत होतास अधूनमधून?” पर्यवेक्षकांचा आवाजावरचा ताबा सुटला होता.
“सर! पेपर लिहून संपला होता आणि वेळ उरला होता म्हणून वाचत होतो आणि काही लिहिताना चुकलंय का, ते तपासत होतो साईड बाय साईड.” अन्याच्या स्वरात किंचितही बदल झाला नव्हता.
“सर! मला वाटतं या कागदात काहीतरी छुपी उत्तरं दडलेली असावीत” पर्यवेक्षक चिरडीला आले होते.
“नाही सर! परीक्षेचा निकाल लागेल तेव्हा बघा! मला सगळय़ात जास्त मार्क्स मिळतील.” अन्या त्याच स्वरात म्हणाला.
नंतर त्याने कबुली दिली की पर्यवेक्षकांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेऊन मी इतरांना कॉपी करायची संधी दिली.
असेच सगळे एकदा कॉलेजातून अन्या आणि त्याचे मित्र सहलीला गेले होते. परतताना स्टेशनवर आले. समोर ट्रेन येत असल्याची वर्दी देणारी देवळात असते तशी भलीमोठी घंटा टांगलेली होती. अन्याच्या डोक्यात काय किडा वळवळला देव जाणे, तो म्हणाला,
“मी ही घंटा वाजवून आरती करतो! पैज!”
कोणीतरी पैज लावली. ट्रेन यायला चांगला अर्धा तास होता.
“मी आलोच!”असं म्हणून तो सटकला. बाहेरच्या दुकानातून जाऊन त्याने गुलाल आणला. सगळय़ांच्या कपाळाला लावला आणि म्हणाला,
“आरती सुरू!” आणि तारस्वरात तो गाऊ लागला,
“आम्ही काय कोणाचे खातो तो देव आम्हाला देतो! बोला करंडेबाबाकी जय!’ आणि जोरजोरात त्याने घंटा वाजवायला सुरुवात केली. रेल्वेचे कर्मचारी धावत आले. अन्या मात्र आम्ही काय कोणाचे खातो तो देव आम्हाला देतो म्हणत नाचू लागला. त्या छोटय़ाशा स्टेशनातल्या गावकऱयांना त्याने सामील करून घेतलं. रेल्वे पोलीस आले. त्यांनी अन्याचा दंड धरला आणि त्याला घंटेपासून दूर खेचायला सुरुवात केली. त्याने गावकऱयांना आवाज दिला,
“बघा! भक्तगणहो! अन्याय! अन्याय!”
एव्हाना त्या सगळय़ा गोंधळात पन्नास-साठ गावकरी जमा झाले.
“अरं! ए पोलीस, हात सोडा त्याचा नाहीतर…” गर्दीच्या भावना बघून पोलीस नरमून बाजूला झाले. त्यानंतर दोन-तीन मिनिटं अन्याची आरती चालू होती.
पैज घेणाऱयाला तब्बल पाचशे रुपयांचा भुर्दंड पडला. आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे नुकताच अन्या नोकरीतून निवृत्त झाला एका बँकेचा मोठा अधिकारी म्हणून. त्याचा गौरव करताना बरेच जण अत्यंत शांत आणि नम्र अधिकारी असा त्याचा गौरव करत होते. मी मात्र तोंड दाबून हसत होतो. त्यांना कळूच शकणार नाही माझ्या हसण्याचं कारण!

[email protected]