फिरूनी नवी जन्मेन मी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

मी नुकतीच लेखनाला सुरुवात केली होती. हळूहळू नवे शब्द सापडत होते म्हणून कधीतरी कवितासुद्धा करून पाहत होतो… आणि मुक्तछंदात जे मनाला येईल ते लिहीत होतो. आपले शब्द कोणाला आवडतील की नाही, हा विचार मनात कधीच नसायचा. गतकाळातल्या आठवणी, हरवलेले क्षण, मनातल्या अस्वस्थ भावना, काही अर्धवट राहिलेल्या भेटी, आजन्म मनात जपलेली घुसमट… सगळं काही माझ्या शब्दातून, लेखणीतून व्यक्त करू लागलो. हळूहळू ते सर्वांना आवडू लागलं. त्यात तूही एक होतीस. तुलाही माझे शब्द आवडू लागले. माझे शब्द वाचता वाचता तू मलाही वाचू लागलीस. अशी शब्दांची आणि विचारांची देवाणघेवाण करता करता आपली मैत्री झाली. ही मैत्री अशीच अजून सुंदर फुलत जाईल, भरत जाईल असं वाटलं मला त्या क्षणी…

आपल्याला जे आतून वाटत असतं, आपल्याला जे मनापासून आवडत असतं, तेच नियतीला मान्य नसतं. या वेळीसुद्धा असंच झालं. शरदाच्या टिपूर चांदण्यात आपली गोष्ट फुलत असताना अचानक तू दूर निघून गेलीस. कुठे हरवलीस तू? एक तप ओलांडून गेलं, पण तू समोर आलीच नाहीस. आता या जन्मात तुझी माझी भेट नाही हा मनाशी विचार पक्का ठरवला. तुझे सगळे क्षण शिशिराची पानगळ यावी तसे हळूहळू निसटून जात होते.

एक दिवस आपण पुन्हा एकदा बोलू लागलो. पुन्हा नव्याने ओळख झाली. तेव्हा मला वाटलं, तू किती बदललीस या मधल्या काळात! पण मला जे वाटत होतं ते चूक होतं. कारण मधल्या काळात एका आघाताने तुझं सगळं आयुष्य बदललं होतं. त्या आघाताने खरं तर तू सगळं काही विसरली होतीस. त्यामुळे पुन्हा प्रत्येक गोष्टीची नव्याने ओळख करून घ्यायची होती तुला. तुझ्या वाचनात पुन्हा माझे शब्द आले. तुला ते वाचता आले, ओळखीचे वाटले आणि हे कुठेतरी आपण वाचले आहे हे तुला वाटू लागलं. त्या शब्दांनी नव्याने पुन्हा आपली ओळख करून दिली. पुन्हा एकदा आपलं बोलणं सुरू झालं…

अगं, ते खूप सुंदर क्षण होते आपले आणि तू अशा वेळी निघून गेलीस, जेव्हा आपली गोष्ट एका सुंदर वळणावर येऊन उभी होती, तेव्हाच्या त्या आठवणी आता मी पुन्हा देऊ शकत नाही तुला. कारण आता तुझी गोष्ट पूर्णपणे बदलली आहे. आता आपली गोष्ट कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण आता आपण पुन्हा भेटलो आहोत तर जुने बंध आठवून एका नव्या गोष्टीची सुरुवात होईल. तुला जितकं जमेल तितकं तू आठवत रहा, मला जेवढं जमेल तितकं मी तुला पाठवत राहीन. सगळ्या जुन्या नव्या आठवणी गोळा करून तुझा एक नवा जन्म व्हावा आणि नव्या जन्माची एक नवी गोष्ट नव्या वर्षात सुरू व्हावी. आपली मैत्रीसुद्धा नव्याने नव्या कवितेसारखी बहरावी. तू पुन्हा नव्याने फिरून नव्याने जन्मावी. आपल्या जुन्या गोष्टींना नव्या शब्दांचा स्पर्श तुझ्या माझ्या मनात पेरला जावा.

कोवळासा हर्ष… असंच सुंदर जावो येणारं हे नवीन वर्ष! सरत्या वर्षाच्या आठवणी काढत नव्या वर्षाचं स्वागत कर. लिही एखादं नवं गाणं जुन्या-नव्या आठवांचं. शब्द शोधू नकोस आता. मीच विषय देतो तुला… आपल्या मैत्रीचा. आपली मैत्री आज पुन्हा नवी असली तरी एका वर्षाने जुनी होणार आहे.

[email protected]