निसर्गमैत्र – फळांचा राजा आंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

नारळ, मुलगा आणि आंबा कसा निघेल हे सांगता येत नाही… असे नेहमी म्हटले जाते. सर्व फळांचा राजा म्हणून ज्याला संबोधले जाते तो म्हणजे आंबा. आंबा न खाल्लेली व्यक्ती भेटणे दुर्लभ. आंबा हा पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

हिंदुस्थानात आंब्याच्या जवळपास 1300 जातींची नोंद आहे. नीलम, हापूस, रत्ना, केसर, दशेरी, पायरी अशा विविध जाती आहेत. आंब्याच्या आकारावरून ही नावे पडली आहेत. जसे की, लंगडा, नारळय़ा, गोटी, लाल्या, पिवळय़ा…गावरान आंबाही आहे, पण सध्या त्याचे अतिशय कमी पीक होत आहे. नगदी पीक म्हणून आंबा लागवड केली जाते. लातूर जिह्यात केसरची अधिक लागवड केली जात आहे. गावरान आंब्याचे एक झाड ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत आंबे देणारे असायचे. पाणी पातळी खालावली आणि गावरान आंबा नष्ट होत आला आहे. प्रत्येक गावात आमराई असायचीच, पण आता ती दिसत नाही.

आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा आहे. अतिसार, रक्तदोष आणि कफ, पित्त दूर करणारा आहे. कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळय़ात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. यासाठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायल्यामुळे उन्हाळय़ाचा त्रास खूप कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळय़ावर ठेवल्यास डोळय़ांची दमणूक आणि ताण कमी होतो. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून आंघोळ केल्यास घामोळय़ाचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठय़ाचे चूर्ण हिरडय़ांच्या पारी कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळय़ाचा त्रास होत नाही. कच्च्या आंब्याचे चविष्ट लोणचे करतात. पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात. रसाची पोळी बनवतात. पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात. हिरव्या कैऱया किसून, वाळवून आमचूर करतात. कैरीची आंबट-तिखट चटणी होते. साखरांबा, गुळांबा आणि अनेक पदार्थ तयार केले जातात. आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरडय़ांचा पायोरीयाही कमी होतो. पिकलेला आंबा शक्तिवर्धक आणि अतिशय रुचकर आहे.

आंबा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते. कैरी खाल्ल्यावर पाणी पिऊ नये किंवा लहान मुलांना कैरीचे पन्हे जास्त प्रमाणात देऊ नये. आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे विरुद्ध आहार मानला जातो.