मिलिंद देवरा मिंधे गटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून मिंधे गटात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिंधे गटात प्रवेश केला. ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र ते नेमके भाजपमध्ये जाणार की मिंधे गटात याबद्दल निश्चित नव्हते. अखेर आज त्यांनी मिंधे गटात प्रवेश केला. गेली 55 वर्षे देवरा कुटुंब हे काँग्रेसशी प्रामाणिक व निष्ठावान राहिले आहे. हे 55 वर्षांचे संबंध तोडून मिलिंद देवरा यांनी पक्षांतर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ईडी, सीबीआयच्या दबावामुळे पक्षांतर

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे धडकी भरल्यानेच ईडी, सीबीआय, आयटीसारख्या केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवून भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी फोडाफोडी करत आहेत. दोन वेळा पराभूत झालेल्या मिलिंद देवरा यांना सोबत घेऊन त्यांनी न्याय यात्रेवरील लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही यात्रा यशस्वी होईल आणि तिची सांगता मुंबईत होईल तेव्हा घटनाबाह्य सरकारचा अंत झालेला असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.