
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होऊ शकत नाही, असे काही लोक म्हणतात. पण रस्ता निघत असतो. 1977 साली काय परिस्थिती होती. तेव्हा कोणी चेहरा नव्हता. तेव्हा लोकांनी चेहरा न पाहता उमेदवार निवडून दिलेत, असे वक्तव्य आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांचा जन्मशताब्दी सोहळा आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. त्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी दंडवते यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण मुख्यमंत्री असताना मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेविषयी चर्चा केली होती आणि त्यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यांनी कोकण रेल्वेसाठी आर्थिक मदत करावी अशी चर्चा झाली होती, अशी आठवण पवार यांनी सांगितली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, मुंबईचा संघर्ष, गोवा मुक्ती आंदोलन अशा अनेक विषयात दंडवते यांनी लक्ष घातले होते, असे पवार म्हणाले.
दंडवते यांची विधान परिषद आणि संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणे अविस्मरणीय ठरल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, माजी पेंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला, शेकाप नेते जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही मधू दंडवते यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी दंडवते यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.





























































