
ठेका मिळवून देतो सांगून दीड कोटीची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी भायुमोच्या माजी पदाधिकाऱ्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळून देण्याच अमिष दाखवून आरोपी भरत उदयसिंग परदेशी (रा. मालेगाव ) याने बनावट कागदपत्रे बनवली. आपले खूप मोठमोठ्या लोकांशी संबंध आहेत असे भासवून तुम्हाला शासनाच्या नवीन कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो व तुम्हाला त्या नवीन कामाचे वर्क ऑर्डर पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगून 1 कोटी 40 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भावेश थोरात (34, कर्मवीरनगर , कोपरगांव ता. कोपरगांव ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरचा घटना ऑगस्ट 2018 ते मार्च 2023 कालावधीत घडला असून गुन्हा दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी नोंदविला गेला आहे.
आरोपी ठरलेल्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर देतो असे सांगून तो टाळाटाळ करत होता. ही बाब फिर्यादी थोरात यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या पैशाची मागणी केली. तेव्हा तुमचे पैसे मी बुडवणार नाही असे सांगत आठ दिवसात तुमचे पैसे व वर्क ऑर्डर देतो असे सांगितले. परंतु त्या नंतर आरोपी यांनी फिर्यादी यांचे फोन उचलणे बंद केले व भेटण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली असता या प्रकरणी कलम 156 (3) नुसार न्यायालयाचे आदेशाने याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील सखोल तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.



























































