
कर्नाटकच्या कलबुर्गी येथे काही दिवसांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा प्रकार घडला होता. आता कलबुर्गी इथेच आणखी एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. येथे आंबेडकर पूजेत सहभागी व्हायला नकार दिल्याने एका विद्यार्थ्याची अर्धनग्न धिंड काढण्यात आली आहे.
कलबुर्गी येथील एका वसतिगृहात ही घटना घडली आहे. येथील एका वसतिगृहात दर रविवारी काही दलित विद्यार्थी आंबेडकरांच्या पूजेचं आयोजन करत होते. दरम्यान, यातील एका विद्यार्थ्यांने या पूजेत सहभागी व्हायला नकार दिला होता.
कारण, त्याला एका महत्त्वाच्या कामाला जायचं होतं. त्याचा राग आल्याने या विद्यार्थ्यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करताना त्यांनी त्या विद्यार्थ्याला अर्धनग्न केलं आणि त्याला हातात आंबेडकरांचा फोटो घ्यायला लावला. त्याची त्याच परिस्थितीत धिंड काढण्यात आली. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.


























































