
>> प्रिया भोसले
नुकताच वहीदा रेहमान ह्यांना चित्रपटसृष्टीचा मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेला.वहीदा रेहमान म्हटलं कि आजच्या पिढीच्या नजरेसमोर घरंदाज ,आबदार व्यक्तिमत्त्व येतं.त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर लक्षात येईल,जवळजवळ सात दशकं त्यांनी आपल्या अभिनयातून चित्रपटसृष्टी गाजवली.
3 फेब्रुवारी 1938 साली तामिळनाडूतल्या चेंगलपड शहरात जन्मलेल्या वहीदा रेहमान यांना खरंतर डाॅक्टर व्हायचं होतं.पण वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर अर्थार्जनासाठी त्यांनी रोजुलू मरायी चित्रपटात एक नृत्य केलं जे इतकं लोकप्रिय झालं कि पडद्यावर ते गाणं लागलं की, लोकं खुश होऊन नाणी फेकायची. एका नृत्यामुळे त्या इतक्या प्रसिद्ध झाल्या की, तमिळ आणि तेलूगू चित्रपटात काम करत असताना त्यांना हिंदीत काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली. एकाचवेळी सीआयडी आणि प्यासासाठी करारबद्ध करण्यात आलं. तुम्ही योग्य असाल तर कुणालाही घाबरायचं नाही ह्या वडिलांनी दिलेल्या विचारांवर त्यांचा इतका विश्वास होता की तेव्हा करारावर सही करण्याआधी त्यांनी स्वतःच्या दोन अटी घातल्या.त्यातील एक होती त्या आपलं नाव बदलणार नाही दुसरी जर कपड्यांबाबतीत काही खटकलं तर त्या तो घालणार नाहीत, थोडक्यात अंगप्रदर्शन करणार नाहीत. खोसला ह्यांना त्या अटी अपमानास्पद वाटल्या.साहजिकच होतं ते,सज्ञान नसल्यामुळे जिच्या करारावर तिची आई सही करणार त्या सतरा वर्षाच्या मुलीने निर्भय होऊन करियरची सुरूवात ही झालेली नसताना अटी घालणं म्हणजे फारच मोठी गोष्ट होती. गुरुदत्त यांनी मात्र दोन्ही अटी मान्य केल्या.पण ह्यानंतर राज खोसला सोबत त्यांचे व्यावसायिक संबध फार चांगले राहिले नाही त्याचा परिणाम सीआयडीतल्या त्यांनी साकारलेल्या भुमिकेवर दिसून येतो.गुरुदत्त यांच्या दिग्दर्शनात प्यासामधली व्यक्तिरेखा आणि सीआयडीतली व्यक्तिरेखा ह्यात फरक दिसून येईल.पुढे गुरुदत्त सोबत त्यांनी बरेच चित्रपट केले.कागज के फुल,साहब बिबी और गुलाम,चौदहवी का चाँद पण अभिनयाचं प्रशिक्षण न घेता पहिल्या हिंदी चित्रपटात गुरुदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्यासातील गुलाबो त्यांनी उत्कटतेने साकारली. प्यासा सुपरहिट झाला आणि वहीदाजींच्या अभिनयाचंही कौतुक झालं.पुढे वेगवेगळ्या बॅनरकडून चांगल्या भूमिकांच्या आॅफर्स येऊ लागल्या.तीन वर्षे गुरुदत्त यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी करार केला असताना ही गुरुदत्त यांच्या समंजस स्वभावामुळे त्यांना दुसरया बॅनरचे चित्रपट करता आले,ज्यात 12’o clock, सोलवा साल,कालाबाजार सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.
त्याचवेळी 1962 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत राय यांच्यावरच्या आदरापोटी त्यांच्या बंगाली अभिजान चित्रपटातही पैसे न घेता,सलग तारखा देऊन काम केलं होतं.सत्यजित राय यांच्या चित्रपटात काम करणारया त्या पहिल्या हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.
चित्रपट मिळण्याबाबतीत वहीदाजी नेहमी सुदैवी होत्या.प्यासा,कोहरा,बीस साल बाद,मुझे जीने दो, तिसरी कसम,नील कमल,खामोशी,फागून आणि गाईड सारखे अतिशय उत्तमोत्तम पिक्चर्स त्यांना मिळाले.ज्यातून सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख झाली.गाईडसाठी तर शिकागो फिल्म फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्राप्त करणारया त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.
फागुनपासून त्यांनी चरित्र भुमिका करायला सुरूवात केली.कभी कभी,अदालत,त्रिशूल, ज्योती बने ज्वाला,नमक हमाल,ज्वालामुखी, नमकिन,कुली,महान, हिंमतवाला,सनी, मशाल,मकसद, अल्लारखा,चांदनी,लम्हे,रंग दे बसंती,दिल्ली ६ मधल्या व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरल्या. गाईडसाठी शिकागो फिल्म फेस्टीव्हलचा, तिसरी कसमसाठी बीएफजेए अवाॅर्ड्स (बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन अवाॅर्ड्स) ,नीलकमलसाठी फिल्म फेयर आणि रेश्मा और शेरासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोबत पद्म पुरस्कार त्यांना मिळाले.
आजच्या कलाकारांप्रमाणे प्रसिद्धीसाठी सतत माध्यमांसमोर येत फिल्मी कारकीर्द सोबत वैयक्तिक बाबींबद्दल स्वतःहून माहिती देणं त्यांना अजिबात पसंत नाही त्यामुळे वादग्रस्त गुरुदत्त विषयावर त्या कधी बोलल्या नाहीत किंवा कौटुंबिक खाजगी गोष्टी माध्यमांसमोर कधी आणल्या नाही.आपल्या conversations with waheeda Rehman पुस्तकात त्या ठामपणे सांगतात कि कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य हे त्याच्यापुरतं सीमित असायला हवं.
माणसाला आयुष्यात नेहमीच स्वतःच्या विचारांवर ठाम राहून जगता येत नाही.परिस्थितीसापेक्ष वागताना बरयाचदा स्वतःच्या स्वभावाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात.तसं केलं नाही तर प्रगती करताना अनंत अडचणी येतात.पण स्वतःवर विश्वास असेल तर विचारांवर ठाम राहून यश मिळतं.वहीदाजींसारखी व्यक्तिमत्त्वं लोकांसमोर आदर्श असतात जे आपल्या तत्वांना मुरड घालून परिस्थितीला शरण जात नाहीत..ते हि चित्रपटसृष्टीसारख्या मोहमायेच्या दुनियेत.अंगप्रदर्शन असो किंवा न पटणारा सीन केवळ सिनेसृष्टीत आपल्याला टिकून रहायचं म्हणून त्यांनी कधीच तडजोड केली नाही.म्हणून आजही सिनेसृष्टीत आजच्या कलाकारांच्या मनात त्यांच्याविषयी कौतुकमिश्रीत आदर दिसून येईल. 3 फेब्रुवारीला त्या वयाच्या 87 वर्षात पदार्पण करतील.त्यानिमित्ताने त्यांच्या सिनेकारकिर्दीचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न!


























































