गडकिल्ल्यांवर महिलांचे ध्वजवंदन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष 350 हून अधिक किल्ल्यांवर तिरंगा फडकावून मोठय़ा उत्साहात साजरा झाला. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हा उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये महिलांनीही मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. तुंग, तिकोना आणि कोरीगड या तीन किल्ल्यांवर महिलांनी ध्वजवंदन केले.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या महिला विशेष मोहिमेची जबाबदारी शुभदा पुरव यांच्यावर सोपवली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या ट्रेकचे नियोजन व तयारी सुरू केली होती. मुंबई, पुणे आणि मावळमधून 125 च्यावर महिला सहभागी झाल्या. तसेच एकूण तीनही किल्ल्यांवर अंदाजे 450 ते 500 गावकऱयांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. 3 ते 60 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील महिला मोहिमेत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे या महिला विशेष ट्रेकमध्ये एका दिव्यांग महिलेनेसुद्धा जवळपास 20 टक्के तिकोना किल्ला सर केला. ढोलताशांच्या गजरात गडावर उपस्थित महिलांचे हळदीपुंकू व साडी वाटप करत सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

महिलांनाही त्यांच्या आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद लुटता यावा, हा संदेशसुद्धा या मोहिमेतून देण्यात आला. शुभदा पुरव, उल्काश्री पेडणेकर, श्रुती कदम, सुप्रिया राऊत, शामला रायरीकर, सारिका कलमबेकर, हेतल चौकडीया, नीलिमा गोंसालवेस या मंडळींनी या एकदिवसीय ट्रेकमध्ये मोलाची कामगिरी बजावली.