
>> लता गुठे
आजोळ म्हणजे प्रत्येकाचं जिव्हाळ्याचं ठिकाण. आजोळचा वाडा, तिथे घालवलेली उन्हाळी सुट्टी, बैलगाडीतून शेतावर जाणं, आंबटगोड कैरी, आंबे यांचा आस्वाद घेणं या बालपणातील रम्य आठवणी. दगडगोटय़ांच्या खडबडीत रस्त्यावरून जाणारी बैलगाडी पाहिली की आजही मन आजोळच्या दिशेने धावत सुटतं. जगण्याच्या नव्या वाटा सापडल्या तरी या आठवणी आणि आजीचा मऊसूत स्पर्श कधीच विसरला जात नाही.
चांदोबा, चांदोबा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?
लिंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी…
आजही मला या बालगीताच्या ओळी ऐकल्या की, माझ्या मामाचा वाडा आठवतो. याच वाडय़ामध्ये माझी दिवाळीची आणि उन्हाळ्याची संपूर्ण सुट्टी जात असे. सुट्टी लागली की, आजोबा घ्यायला यायचे. दगडगोटय़ांच्या खडबडीत रस्त्यावरून आमची बैलगाडी ‘खड…खड…खड’ करत इकडून तिकडे हेलकावे घेत घेत आजोळच्या दिशेने धावत सुटायची. आमची वाट पाहत दारात उभी असलेली आजी पाहून खूप आनंद व्हायचा.
वाडय़ाला दगडाच्या चिऱयांनी बांधलेल्या भक्कम भिंती, लाकडाचा कोरीव दरवाजा आणि दरवाजाच्या वर एक खिडकी होती. वर गेलं की, त्या खिडकीतून बाहेरचा दूरवरचा परिसर दिसायचा. वाडय़ाच्या उजव्या बाजूला दुकान आणि त्यावर माडी होती. माडीवरून अर्ध्या गावाचं दर्शन व्हायचं. वाडय़ातून दुकानात जायला रस्ता होता आणि माडीवर जायला अंधारा निमुळता जिना होता. अंधारात जिन्यातून माडीवर जायला भीतीची घंटा वाजायची. दाराच्या दोन्ही बाजूला दोन छोटय़ा छोटय़ा देवळी होत्या. त्यामध्ये दिवा लावला जात असे. त्या खिडकीत बसून पुस्तक वाचताना मस्त वाटायचे. कारण उन्हाळ्यातही थंडगार हवा असायची.
दरवाजाला मोठा भक्कम उंबरा होता. घराच्या मर्यादेचे प्रतीक असलेला. मोठासा कडीकोयंडा होता. अंगणात आजी रोज झाडून काढून सडा टाकायची. त्यावर पांढऱया ठिपक्यांची रांगोळी घातलेली असायची. ते अंगण सकाळी उठून पाहताना प्रसन्न वाटायचं. कारण सडा टाकताना आई म्हणायची…
सकाळी उठून हाती माझ्या सडापात्र
सडा टाकते पवित्र राम रथातून उतरे…
किंवा
सकाळी उठून हाती माझ्या झाडनी
झाडते ईश्वराची नहानी
राम मनी राम ध्यानी
रामावाचून नाही कोणी…
अशा आजी वा आईच्या गोड आवाजातील ओव्या कानी पडल्या की, मन प्रसन्न व्हायचं. संक्रांत सांगायला ब्राह्मण आला की, ओटय़ावर मोठी सतरंजी अंथरली जायची आणि सर्व गल्लीतील बायका येऊन संक्रांत ऐकायच्या. पंचमी सणाला रात्री जेवण झाल्यावर त्याच अंगणात फेर धरून स्त्रिया गाणी म्हणायच्या. त्यांच्या खळखळून हसण्याचा आवाज अंगणभर पसरायचा आणि रात्र दरवळून जायची. अंगणात आम्ही मैत्रिणी लंगडी, लगोरी असे खेळ खेळायचो आणि त्याच अंगणात भातुकलीच्या खेळाने संसाराची सुरुवात केली.
वाडय़ात जागोजागी कोरीव खांब आणि त्यावर असलेलं लाकडी छत. पांढऱयाशुभ्र मातीने हाताने आजीने सारवलेल्या भिंती आणि खाली शेणाने सारवलेला परवर असल्यामुळे या वाडय़ात उन्हाळ्यात कधीच गरम होत नसे व थंडीतही थंडी वाजत नसे. वाडय़ाच्या मधोमध मोठा चौक होता. त्या चौकातून येणारी सकाळची कोवळी किरणं झरोक्यातून वाडाभर नाचत राहायची. पावसाची रिमझिम, अवकाळी पावसात येणारा गारांचा पाऊस आणि गारा गोळा करत असताना आलेली मजा कधीच न विसरता येणारी, बालमनाला सुखावणारी. चौकाच्या चारही बाजूंनी खोल्या आणि पाण्याचा मोठा रांजण. त्याच्याच बाजूला तुळशी वृंदावन आणि समोर आंघोळीसाठी असलेला मोठा दगडी चौरंग होता. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला एक खुली हवेशीर खोली असायची. त्याला ढाळज असं म्हणत. तिथे हिंदुस्थानी बैठक असे. आजोबा मोठा पितळेचा पानाचा डबा समोर ठेवून मांडी घालून बसायचे आणि पान खायचे. अडकित्त्याने कातून सुपारी थोडीशी आमच्या हातावर ठेवायचे.
चौकाच्या दुसऱया बाजूला लांबच लांब असलेली ओसरी 100 लोक बसू शकतील एवढी. वसरीच्या आतल्या बाजूला मोठय़ा दोन खोल्या होत्या. एका खोलीत आजीने लावलेल्या गाडग्यांच्या आणि तांब्यापितळेच्या भांडय़ांच्या उतरंडी. त्या गाडय़ांमध्ये तिचे दागिने, पैसे ठेवलेले असायचे आणि भरलेल्या गाडग्यांमध्ये कोणत्या गाडग्यात कुठली वस्तू ठेवलेली आहे ते तिला बरोबर माहीत असायचे. त्याच खोलीत मोठा संदूक होता. त्यात तांब्यापितळेच्या भांडय़ांचं कोठार होतं. काशाच्या वाटय़ा, ताटं विविध आकारांची होती. ती भांडी इतकी सुंदर होती की, आता तशी पाहायलाही मिळत नाहीत. दुसऱया खोलीत मात्र शेतीतील धान्याच्या पोत्याच्या थप्प्या होत्या.
अतिशय नैसर्गिक ठिकाणी असलेलं हे माझं आजोळ. त्याच्या चारही बाजूने डोंगर आणि डोंगरांच्या मध्ये दरीत असलेलं हे रम्य गाव. पन्नास वर्षांपूर्वीचं आज खूप बदललं आहे
चौकाचे वाडे जाऊन तिथे सिमेंट काँक्रीटचे बंगले दिसतात. मामाचा वाडा मात्र अजून तसाच उभा आहे. आजही बालपण आठवताना ते अंगण, तो वाडा, त्या गल्ल्या, रस्ते…अशा अनेक आठवणी जाग्या होतात आणि मग धावत सुटतं त्या कोवळ्या पाऊलवाटेने.
[email protected]




























































