वेबसीरिज – साधीसोपी तरीही वेगळी कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तरंग वैद्य

एक तरुण जोडपं आणि व्यंकूची कहाणी म्हणजेच ‘पेट पुराण’. घरात कुत्रा पाळल्यापासूनच्या गमती जमती, गोंधळ, त्रास, तर कधी मनस्ताप दर्शवणारी अन् वेळोवेळी सामाजिक बोध देणारी ही मालिका. ही मालिका बघितल्यावर या दुसऱया लोकांचा ‘पेट्स’ म्हणजे पाळीव प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक होईल असा या मालिकेचा प्रभाव आहे.
‘पेटि पुराण’… इथे ‘पेट’चा अर्थ हिंदीतलं (पोट) नसून इंग्रजीतलं (पाळीव प्राणी) आहे. एक तरुण जोडपं आणि व्यंकूची (कुत्र्याचे नाव, पण कुत्र्याला कुत्रा म्हटलं की, मालकाला राग येतो हे ही वेब सीरिज बघून समजले म्हणून त्याला ‘व्यंकू’, त्याच्या नावाने संबोधले आहे) कहाणी म्हणजेच ‘पेट पुराण’.

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 6 मे, 2022 ला साधारण अर्ध्या तासाचे सहा एपिसोड घेऊन ‘पेट पुराण’ नावाची एक मराठमोळी वेब सीरिज दाखल झाली. एक तरुण जोडपं कुत्रा पाळायचं ठरवतात आणि कुत्रा घरी आल्यापासूनच्या गमती जमती, गोंधळ, त्रास, तर कधी मनस्ताप दाखवत ही कथा पुढे जाते, पण नुसती पुढेच जात नाही, तर वेळोवेळी सामाजिक बोधही देऊन जाते. पाळीव प्राण्यांबद्दल समाजात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे पाळीव प्राण्यांना अतिशय प्रेम करणारे, त्यांना घरच्या सदस्यासारखे वागवणारे आणि दुसरे असल्या लोकांवर हसणारे, या प्राण्यांना महत्त्व न देणारे, किंबहुना त्यांचा तिरस्कार करणारे. ही मालिका बघितल्यावर या दुसऱया लोकांचा ‘पेट्स’ म्हणजे पाळीव प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक होईल असा या मालिकेचा प्रभाव आहे.

अदिती आणि अतुल, अदितीच्या बहिणीच्या डोहाळ जेवण समारंभात आले आहेत. नातेवाईकांच्या भेटीगाठी होत आहेत. इथपासून कथा सुरू होते. समारंभात जवळचे काय आणि लांबचे काय, सर्वच नातेवाईक “लग्नाला पाच वर्षे झाली, आता मनावर घ्या’’ असा सल्ला या दोघांना देतात. वैतागलेले दोघे घरी आल्यावर “आपली इच्छा नसताना ही जबरदस्ती का?’’ यावर चर्चा करतात आणि मग कुठेतरी त्यांच्या मनात एखादा प्राणी पाळावा हा विचार येतो. त्यांचा मित्र पराग, ज्याच्याकडे एक छान माऊ आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करतो.

कुत्रा घ्यायच्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना काही वेळ जातो. यादरम्यान त्यांच्या लक्षात येतं की, कुत्रा ही काही वस्तू नाही की, मोजले पैसे आणि आणलं घरी. ते व्यंकूला दत्तक घेतात. कुत्रा पाळणं सोपं काम नाही हे त्यांच्या लवकरच लक्षात येतं. एका मूक प्राण्याच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं. कारण तो आपल्यासारखं बोलून दाखवू शकत नाही. जे काही सांगायचे ते हावभावातून आणि भुंकण्यातून. त्याचे हावभाव समजले, कधी तो प्रेमाने आणि कधी रागाने भुंकतोय हे कळलं की, आपण जिंकलो हे समजायचं.

लवकरच व्यंकू त्यांना आणि ते व्यंकूला समजू लागतात आणि व्यंकू त्यांच्या आयुष्याचा भाग बनतो. आता त्यांनाही व्यंकूला कोणी कुत्रा म्हणून संबोधले की, आवडत नाही. आपली मुलं काय विचित्र वागत आहेत, मूल जन्माला घालून त्याचे संगोपन करायचे सोडून एका कुत्र्याच्या संगोपनात वेळ दवडत आहेत असा विचार करून अदिती आणि अतुलची आई त्यांच्या कडे राहायला, समजवायला येतात… आणि व्यंकूच्या प्रेमात पडतात.

साधीसोपी, पण वेगळी कथा आहे, परिणामकारक आहे. प्राण्यांच्या आयुष्याची ही एक कथा असते, आपल्याप्रमाणे त्यांचाही भूतकाळ असतो, त्यांना पण भावना असतात हे सहजपणे दाखवले आहे (व्यंकू लाल गुलाबांना घाबरतो. कारण त्याला एक भूतकाळ असतो). कुत्रा पाळायला परवानगी आवश्यक असते, काही नियम असतात ही माहितीही या वेब सीरिजच्या माध्यमातून मिळते. बरेच लोक उत्साहात एखादा प्राणी घेऊन येतात आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, हे आपल्याला झेपण्यासारखे नाही तेव्हा ते त्यांना वाऱयावर सोडून देतात. अशा प्राण्यांना सांभाळणाऱया संस्था असतात. या संस्था कोणालाही प्राणी दत्तक देत नसून संपूर्ण शहानिशा करूनच त्याला दत्तक देतात (अगदी मूल दत्तक देतात त्याप्रमाणे) हे या मालिकेच्या माध्यमातून समजलं. अशा संस्थांना आदरयुक्त अभिवादन!

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर… दोघांनी मिळून हे ‘पेट पुराण’ छान रंगवले आहे. दोघांचा वावर अगदी सहज आहे. व्यंकूबरोबर दोघे समरसून गेलेले दिसतात. व्यंकूला नक्कीच त्यांची आठवण येत असणार. कडक शिस्तीतले सतीश आळेकर आवडले. आपल्या माऊला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करणारा ऋषी मनोहरही लक्षात राहतो.

मानवी जीवनाच्या विविध छटांवर आधारित खूप वेब सीरिज, सिनेमे येतात, पण प्राण्यांच्या भावनांवर आधारित कलाकृतींचे प्रमाण खूपच कमी. अदिती-अतुल-व्यंकू आणि बाकू (मांजर) यांची भावनेच्या दोऱयात गुंफलेली ही कथा जरूर बघा.

 [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)