
बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या नणंद भावजया समोरासमोर उभ्या राहणार आहेत याची सर्वत्र चर्चा असतानाच आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रं पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले कुटुंब म्हणून मला विचारले तर पवार विरुद्ध पवार होऊ नये. संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते. पण भाजपला जे हवे ते जर अजितदादा करत असतील तर तो त्यांचा त्यांचा विषय आहे. त्यामुळे जो उमेदवार त्यांच्याकडून दिला जाईल आम्ही ताकदीने लढणार, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
रोहित पवार आज विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत असताना फोन टॅपिंगबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, माझ्या अंदाजाने फोन टॅपिंगसाठी जे ठराविक नंबर दिलेले, त्यात माझाही नंबर असावा. आता ते सरकारने केलंय की माझ्यावर जी संस्था कारवाई करतेय त्यांनी केलेय हे मला तरी सांगता येणार नाही. पण आम्ही फोनवर लोकांच्या हिताची कामं सोडली तर दुसरं काही बोलत नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ऐकायचं तेवढं ते ऐकू शकतात. आता याच्यामध्ये आपला फोन टॅप होतो हे कसे शोधायचे हे कुठेतरी बघावे लागेल. शेवटी अधिकारी हे लोकांसाठी काम करणारे अधिकारी असतात. एखाद्या व्यक्तीवर मुद्दामहून राजकीय द्वेषाने अन्याय होतोय असे जेव्हा अधिकाऱ्यांना कळतं तेव्हा एखादी गोष्ट आपल्यापर्यंत उडत उडत येते. फोन टॅप होतोय की नाही? हा त्याचाच भाग असावा माझ्याकडे ठोस अशी माहिती नाही पण होत असेल अशी शक्यताही वर्तवली.
सामान्य लोकं जातीयवादी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील.
जरांगे पाटील यांच्या पाठिमागे बोलवता धनी शरद पवार, राजेश टोपे असल्याचा भाजपकडून आरोप होत आहेत यावर रोहित पवार म्हणाले, गेल्या 50 वर्षामध्ये भाजपबाबत बोलायचे तर शरद पवार यांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपच राजकीय दृष्टीकोनातून कधीही भलं झालेले नाही. त्याचदृष्टीकोनातून वेगळं वातावरण निर्माण करावे, म्हणून हे भाजपचे नेते त्याबाबतीत बोलत असावे. एकच सांगतो की, कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल हे मी इथे सांगणार नाही, पण सामान्य लोकं लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत या जातीयवादी आणि धर्मवादी सरकारचा भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाचा करेक्ट कार्यक्रम 100 टक्के करतील असा ठाम विश्वास रोहीत पवार यांनी व्यक्त केला.
पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा
पवार कुटुंबियांमध्ये लोकसभा निवडणुकीमुळे वाद निर्माण झालेला आहे यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, भाजपला जे हवं होतं ते त्यांनी केले आहे. अजितदादांचा वापर हा भाजपने केलेला आहे. गेल्या अनेक वर्षात शरद पवार असतील किंवा पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रात टिकावा यासाठी संघर्ष केला. त्यामुळे भाजपला अनेकदा अडचणीत यावे लागलं आणि मग पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय. बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचे तर, त्यामध्ये जो काही निकाल लागेल त्यात भाजपला जे हवे पवार विरुद्ध पवार झालेले आहे. शेवटी त्यांनी कितीही चाणक्यशाहीचा प्रयत्न केल तरी सामान्य लोकं नक्कीच निकाल हा पुरोगामी विचारांच्या आणि शरद पवार यांच्या बाजूने देतील असा विश्वास व्यक्त केला. .
सुमित्रा पवारांनी निवडणुक लढवावी की नाही, काय वाटत यावर रोहित पवार म्हणाले, आज अजित पवार त्याबाबतीत निर्णय घेतील. अजित पवार यांचा आता वेगळा पक्ष आहे. चोरलेला का होईना पण त्यांचा एक वेगळा पक्ष आहे अशी खोचक टोलाही लगावला. त्यामुळे ते तिथे जी भूमिका घेतील, जो उमेदवार देतील तोच उमेदवार त्यांच्याकडून फायनल असेल असे ते म्हणाले. सुमित्रा पवार म्हणाल्या आहेत. ज्याप्रकारे अजित पवारांनी बारामतीचा विकास केला त्याप्रकारे अजित दादांचा जो कोणी उमेदवार असेल, त्याला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे निवडुन द्या. तरच तुम्हाला इथे पुनर्विकास पाहायला मिळेल. त्यावर रोहीत पवार म्हणाले, अजित पवार यांनी जो विकास केला तो कसा केला, काय केला त्याच्यामध्ये शरद पवार यांचे योगदान होते की नव्हते? हे लोकांना माहित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून जेव्हा उमेदवार फायनल होईल आणि त्यांचे नाव फायनल होईल त्यानंतरच आम्ही याबाबतीत बोलू.
मराठा आरक्षणाचं विधेयक राज्यपालांकडे गेले की नाही
लोकसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षणाचं विधेयक आणलं होतं. आता हे विधेयक राज्यपालांकडे गेले की नाही तेही बघावे लागले,. पूर्वी कांग्रेसच्या काळात 16 टक्के आरक्षण दिलेले होते.,भाजपने ते 13 टक्क्यांवर आणलं होतं आता ते 10 टक्क्यांवर आणलं आहे. खरंतर यावर अभ्यास व्हायला हवा होता. केंद्र सरकारच याबाबतीत मार्ग काढू शकतं. कारण हे बिल कोर्टात टिकेल की नाही याची अनेकांना शंका आहे आणि कोर्टात टिकवायचे असेल तर केंद्र सरकारला विश्वासात घेतले असते तर ट्रिपल इंजिन सरकार आहे तर मग कदाचित योग्य ठरु शकले असते. कदाचित हा विषय घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी केले नाही, कदाचित त्यांचे धाडस झाले नसावे असाही खोचक टोला त्यांनी लगावला.



























































