स्फोट झाल्याने मागवलेले जेवण मिळाले नाही; रामेश्वरम कॅफेच्या ग्राहकाने मागितले रिफंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील बंगळूर येथे 1 मार्चे रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये भयंकर स्फोट झाला. या स्फोटात नऊ जण जखमी झाले असून त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट आयईडी स्फोट असल्याचे तपासांती स्पष्ट झाले आहे. या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला असताना एका ग्राहकाने मात्र विचित्र मागणी केली आहे.

स्फोट होण्यापूर्वी जेवण मागवले होते, स्फोट झाल्याने कॅफे ग्राहकाची ऑर्डर पूर्ण करू शकले नाही. कॅफेकडून ऑर्डरची पूर्तता न झाल्याने रिफंड मिळू शकेल का? असा विचित्र सवाल ग्राहकाने केला आहे.

स्फोटाचे वार्तांकन करत असलेल्या बंगळुरूमधील एका पत्रकाराने प्रत्यक्षदर्शींची मुलाखत घेत असताना रिफंड मागणाऱ्या ग्राहकाशी त्यांची गाठ पडली. पत्रकार संजय राज पी यांनी याबद्दल आपल्या “X” हँडलवर घडलेल्या प्रकाराचे वर्णन केले आहे. सदर ग्राहकाने काऊंटरवरून टोकन खरेदी केले, आणि त्यानंतर काही क्षणांतच स्फोट झाला. नंतर मुलाखत देत असतानाच कॅफे त्याचे पैसे परत करेल का? असा सवाल त्याने केला. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहावयास मिळत आहेत.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि भाजप नेते विजयेंद्र येडियुरप्पा यांनी कॅफेतील स्फोटातील जखमींची भेट घेतली. तसेच पीडितांना मदतीचे आश्वासन दिले.