
‘गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजप महायुतीचे 42 खासदार निवडून दिले होते. ते नसते तर भारतीय जनता पक्षाला 250 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नसत्या. दिल्लीचे तख्त राखता आले नसते. आता दिल्लीचे ते हुकूमशाही तख्त फोडून तिथे आपले तख्त बसवावे लागेल. भाजपा यावेळी 400 पार कशी जाते तेच पाहते, असे ठणकावत ‘अब की बार, भाजप तडीपार’ अशी गर्जनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
आमदार कपिल पाटील यांनी ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानिमित्त धारावी येथे आयोजित संयुक्त समाजवादी संमेलनात उद्धव ठाकरे बोलत होते. ‘मोदींना काय पर्याय आहे, असे आम्हाला सुशिक्षित लोक विचारतात तेव्हा मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे, अशी विचारणा आम्ही करतो. इंडिया आघाडी ही मोदींविरोधात नाही, तर हुकूमशाहीविरोधात एकत्र आली आहे. हुकूमशाहीप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी अशी ही लढाई आहे. हुकूमशाहीला एकमेव पर्याय असलेली लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी नावाचे एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.
‘देशाला लढवय्यांची गरज असताना कपिल पाटील यांनी पक्ष काढला. त्या पक्षाच्या उद्घाटनाला समाजवादी आणि हिंदुत्ववादी एकाच मंचावर कसे यावरून अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण माजवादी विरुद्ध समाजवादी अशी ही लढाई आहे.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भ्रष्टाचारी कृपाशंकरना तिकीट, पण निष्ठावंत गडकरींना डावलले, हीच का मोदी गॅरंटी?
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली. ‘मोदी-शहा यांची नावेही ऐकली नसतील तेव्हापासून नितीन गडकरी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातला मुंबई-पुणे महामार्ग त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या गडकरींचे नाव त्या यादीत नाही, पण बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप असलेल्या कृपाशंकर ंिसह यांचे नाव पहिल्याच यादीत आहे, असे सांगतानाच हा नवा भाजप आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हेच भ्रष्टाचारी उद्या त्यांच्या विजयाची छातीठोक गॅरंटी देतील,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
‘जुमला’चेच नामकरण ‘गॅरंटी’ झालेय
भाजपने गेल्या दहा वर्षांच्या राजवटीत देशातील अनेक शहरे, रेल्वे स्थानके तसेच अनेक योजनांची नावे बदलून त्यांच्या नेत्यांची नावे दिली. त्याचप्रमाणे ‘जुमला’चे नामकरण आता ‘गॅरंटी’ झाले आहे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी यावेळी उडवली. देशातील जनता या जुमलेबाज गॅरंटीविरुद्ध मत देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समुद्रतळाला जाता, मणिपूरला का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला जाऊन समुद्रात डुबकी घेतात, खोल समुद्रात जाऊन त्यांनी द्वारका पाहिली, समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, मग मणिपूरला का जाऊ शकत नाहीत? रामनामाचा जप करू शकता मग रामराज्य आणा ना! मोदी सरकारचा कारभार नाही, तर देशावर फक्त भार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मी लढाईला मैदानात उतरलो आहे. तुम्ही सर्व सोबत आहात. ही लढाई एकटय़ाची नाही. मला पंतप्रधान व्हायचंय म्हणून नाही. ही भावी पिढय़ांची लढाई आहे. तुमच्या पिढय़ा देशात राहणार आहेत. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार आहे हे ठरवणारी ही लढाई आहे आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हुकूमशहाचे पहिले थडगे बांधल्याशिवाय राहणार नाही.
ईव्हीएम घोटाळा कराल तर देशात असंतोषाचा भडका उडेल!
देशातील वातावरण पाहिले तर अंधभक्त वगळता वरून खालपर्यंत सगळेच भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. उद्योगपती, शेतकरी, विद्यार्थी, कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तरीही ते गप्प आहेत. कारण भाजप ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकते असा त्यांच्यात संभ्रम आहे. पण ईव्हीएम घोटाळा कराल तर देशात असंतोषाचा भडका उडेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिला. ईव्हीएम घोटाळा करून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले.
प्रभावळकरांची ‘हसवाफसवी’ तशी मोदींची ‘फसवाफसवी’
दिलीप प्रभावळकर यांची ‘हसवाफसवी’ होती तशी मोदींची ‘फसवाफसवी’ सुरू आहे, प्रत्येक वेळी वेगवेगळी रूपे घेऊन येतात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 25 वर्षे शिवसेना-भाजप युती होती, पण शिवसेनाही फसली. दोन वेळा मोदींच्या भूलथापांना भुलून शिवसेनेने पाठिंबा दिला आणि पदरात धोंडे पडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अब की बार भाजप तडीपार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कपिल पाटील यांनी रविवारी धारावी येथे आयोजित संयुक्त समाजवादी संमेलनात ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली. यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, प्रा. नीरज हातेकर, विभागप्रमुख महेश सावंत आदी उपस्थित होते.





























































