
गौतम गंभीर, जयंत सिन्हा, पवनसिंह यांच्यापाठोपाठ भाजपचा चौथा उमेदवारही लढण्यापूर्वीच मैदानातून पळाला आहे. भाजपचे उपेंद्र रावत यांनी आपण बाराबंकीतून लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. यादी जाहीर करण्यापूर्वीच क्रिकेटर गौतम गंभीर याने आपण लढणार नसल्याचे जाहीर केले होते. तर जयंत सिन्हा यांनी आपण पर्यावरणासाठी काम करणार असल्याने राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती. या दोघांनी लढण्यापूर्वीच माघार घेतल्यानंतर भाजपला तिसरा धक्का भोजपुरी गायक पवनसिंह यांनी दिला. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून लढण्यास असमर्थ असल्याचे सांगत पवनसिंह यांनी लढण्यापूर्वीच माघार घेतली.
आज बाराबंकी येथील उपेंद्र रावत यांनी भाजपला संकटात टाकले. भाजपच्या 195 जणांच्या यादीत बाराबंकी येथून उपेंद्र रावत यांना तिकीट जाहीर करण्यात आले. तिकीट जाहीर होताच उपेंद्र रावत यांचा परदेशी महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर नेटकर्यांनी त्यावरून रावत यांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर उपरती झालेल्या रावत यांनी जोपर्यंत अश्लील व्हिडीओचे सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. व्हायरल व्हिडीओ ‘डीपफेक’ असल्याचा आरोपही रावत यांनी केला. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या व्हिडीओची चौकशी करावी, अशी मागणीही रावत यांनी केली.





























































