
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बस गाडय़ा दाखल होणार आहेत. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. मात्र बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार बसेस स्वमालकीच्या राखण्याच्या धोरणाला याचा फटका बसणार आहे.
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती खालावल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. एकेकाळी ‘बेस्ट’ बसेसची संख्या स्वतःच्या पाच हजार बसेसची संख्या आता 2978 वर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बसेसचाही समावेश आहे. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांवर आली आहे. मात्र आता प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुविधेसाठी 2027 पर्यंत गाडय़ांचा ताफा दहा हजारांवर नेण्यात येणार आहे. दरम्यान, आता हरयाणा स्थित पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीकडून 12 मीटर लांबीच्या 250 बस गाडय़ा घेण्यात येणार आहेत. या बस गाडय़ा येत्या तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. ही कंपनी एकूण 2400 बस गाडय़ांचा पुरवठा करणार आहे.
नव्या बससाठी आणखी दोन करार
‘बेस्ट’मध्ये सध्या मातेश्वरी कंपनीकडून 200 सीएनजी बस, ओलेक्ट्रा कंपनी 2,100 इलेक्ट्रिक बस, स्विच मोबिलिटी कडून 200 दुमजली इलेक्ट्रिक बसेस व कॉसिस कंपनीकडून 700 दुमजली बस घेण्याचे करार याआधीच संमत झाला आहे. मात्र या नवीन बसगाडय़ा येण्याचा वेग पाहता दुसरा पर्याय म्हणून बेस्टने आणखी दोन करारास मान्यता दिली आहे. त्यात पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोलुशन कंपनीचा समावेश झाला आहे. 250 बसेसचा पुरवठा करण्यात येणार असून एक बस चार्जिंग केल्यानंतर 180 किलोमीटर धावणार असून 30 ते 40 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे.























































