
>> आशुतोष बापट
प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तत्कालीन साम्राज्याच्या राणीला विशेष महत्त्व असायचं. साम्राज्याची राणी विशेष प्रभावशाली असायची. म्हणजे स्त्रियांना काही स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना कुठले अधिकार नव्हते असं जे काही चित्र रंगवलं जातं, तशी परिस्थिती नव्हती. किंबहुना अनेक राण्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा इतिहासावर उमटवला आहे.
प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना अशा अनेक परामी, कर्तृत्ववान राण्या आपल्याला भेटत राहतात. तामीळनाडू प्रांतात चोल राजवंशात पण अशीच एक मोठी कर्तृत्ववान राणी होऊन गेली जिचे नाव होते सेंबियन महादेवी. इ.स.च्या दहाव्या शतकात होऊन गेलेली ही राणी मोठी कलासक्त, धार्मिक आणि कर्तबगार होती. हिचे कर्तृत्व म्हणजे हिने मंदिरांना नुसत्या देणग्याच नाही दिल्या, तर नवीन मंदिरे बांधून घेतली, मूर्तिशाळा वसवल्या आणि त्यातून ब्राँझच्या विविध मूर्ती घडवून घेतल्या. राणीने घडवलेल्या मूर्तींमध्ये नटराजाची मूर्ती विशेष देखणी आणि प्रसिद्ध आहे. ही मूर्ती कुंभकोणमजवळच्या कोनेरी राजपूरम नामक गावी असलेल्या उमा महेश्वरस्वामी मंदिरात आजही बघायला मिळते. मूर्ती बघून डोळ्याचे पारणे फिटते. तिने घडवून घेतलेल्या अशा ब्राँझच्या अनेक मूर्ती आजही तामीळनाडूमधल्या विविध मंदिरांतून पुजल्या जातात.
सेंबियन महादेवी या नावाच्या बऱ्याच राण्या चोलांच्या इतिहासात आढळतात. कदाचित ही उपाधीसुद्धा असू शकेल. ही सेंबियन महादेवी चोल राजा गंडरादित्य याची ही पत्नी. पण ती जास्त ओळखली जाते ती तिच्या मुलाच्या नावावरून. तिचा मुलगा उत्तम चोल. त्यामुळे ती उत्तम चोलाची आई म्हणून जास्त ओळखली जाते. खरं तर सेंबियन महादेवी ही एक पदवी आहे. सेंबियन म्हणजे शिबी राजाच्या वंशातली. चोल राजे स्वतला शिबी राजाचे वंशज म्हणवून घेत असत. महादेवी म्हणजे राणी. सेंबियन महादेवी नंतर इतरही अनेक चोल राण्यांनी ही उपाधी धारण केली, पण ही पहिली सेंबियन महादेवी जी गंडरादित्य चोल राजाची राणी आणि राजा उत्तम चोलची आई. ती दीर्घायुषी होती. आपल्या आयुष्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे, जीवनातले अनेक चढ-उतार या राणीने बघितले. आपला हक्क सोडून आपल्या काकाचा राज्याभिषेक केला तो राजा म्हणजे अरुलमोळीवर्मा म्हणजेच चोलांचा अत्यंत सामर्थ्यशाली सम्राट ‘राजराजा चोल’ होय. अरुलमोळीवर्मा पुढे आपल्या काकाच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. त्याच्या काळात चोल साम्राज्याची कीर्ति पार सातासमुद्रापलीकडे जाऊन पोचली. राजराजा चोलाच्या राज्याभिषेकानंतर पुढे तब्बल सोळा वर्ष सेंबियन महादेवी जिवंत होती आणि तिला राजघराण्यात मानाचे स्थान होते हे अनेक शिलालेखांवरून सिद्ध होते.
अशी ही दीर्घायुषी सेंबियन महादेवी राणी. तिचा पती गंडरादित्य हा उत्तम कवी होता. चोल राजवंशाचे आराध्यदैवत असलेल्या चिदंबरमच्या नटराजाचा तो परमभक्त होता. चिदंबरमला उद्देशून त्याने अकरा स्तुतीपर पदे लिहिली आहेत, जी थिरुवसैप्पा या नावाने आजही चिदंबरममध्ये गायली जातात. सेंबियन महादेवी आणि तिचा पती गंडरादित्य या दोघांनीही मंदिरांना विपुल दाने दिली. पण नवीन मंदिरे बांधण्याचे श्रेय मात्र सेंबियन महादेवीलाच द्यावे लागेल. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने कुंभकोणमजवळच्या कोनेरी राजपुरम नामक गावी उमा महेश्वरस्वामी या नावाने एक शिवमंदिर बांधले आहे. त्या मंदिरात गाभाऱ्याबाहेरच्या भिंतीवर एक शिल्प कोरलेले आहे ज्यामध्ये राजा गंडरादित्य शिवांची आराधना करताना दाखवला असून त्याखाली एक शिलालेख कोरलेला आहे ज्यात ही सेंबियन महादेवी स्वतचा उल्लेख गंडरादित्याची प्रिय पत्नी आणि मदुरान्तक उत्तम चोलाची आई असा करते. याच मंदिरात वर उल्लेख केलेली नटराजाची ब्राँझची याच राणीने घडवून घेतलेली अतिसुंदर मूर्ती ठेवलेली आहे. याचबरोबर तिने आदूतुराई, थिरुकोट्टीकावळ, कुट्रालम, थिरूनल्लम, कोनेरीराजपूरम, थिरुनरैयूर या ठिकाणीसुद्धा मंदिरे बांधली आहेत. ती मंदिरे बांधणारी राणी म्हणूनच प्रसिद्ध होती. तिचा मुलगा उत्तम चोल गादीवर आल्यावर या राणीने बरीच नवीन मंदिरे बांधलेली दिसतात. शिवाय जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, ब्रॉन्झच्या मूर्ती घडवून त्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट म्हणून देणे, वेगवेगळ्या मंदिरांना वर्षासने, सोन्याचे दागिने देणे अशी धार्मिक कामेसुद्धा तिने केलेली आहेत.
सेंबियन महादेवीची लोकप्रियता एवढी होती की तिच्याच नावाचे एक गाव तामीळनाडूमध्ये वसवले आहे. ‘सेंबियन महादेवी’ हेच नाव असणारे गाव नागापट्टीनमजवळ आहे. ह्या गावात राणीने कैलासनाथ स्वामींचे मंदिर बांधले व चारी वेदांचे ज्ञान असलेल्या विद्वान चतुर्वेदी ब्राह्मणांना अग्रहार व दाने दिली तसेच वेदपाठशाळाही काढून दिल्या. ह्या मंदिरात सेंबियन महादेवीचा वाढदिवस दर वर्षी साजरा केला जात असे. तिच्या मुलाच्या मृत्युनंतर तिचा पुतण्या राजराजा चोल गादीवर आला, तरीही तिचे राजघराण्यातील स्थान आणि महत्त्व अबाधित होते. तिला पूर्वीइतकाच सन्मान राजराजानेसुद्धा दिला. नुसता सन्मान दिला असे नव्हे तिने बांधलेल्या मंदिरांना तिने दिलेली वर्षासने कायम ठेवली. शिवाय त्या मंदिरांना राजाने दाने दिली. या राजराजाची बहीण म्हणजेच सेंबियन महादेवीची पुतणी ‘कुंदवै नचियार’ हिनेसुद्धा आपल्या काकूचा आदर्श ठेवून मंदिरनिर्मितीची परंपरा कायम ठेवली.
प्राचीन भारताच्या इतिहासात जेव्हा कधीही राजघराण्यातील स्त्रियांचा उल्लेख येईल, तेव्हा सेंबियन महादेवीला टाळून पुढे जाताच येणार नाही. तामीळनाडूमधल्या समृद्ध चोल घराण्याची ती प्रमुख ओळख होती. जसे या चोल राजवंशात पुढे अनेक कर्तृत्ववान आणि सामर्थ्यशाली राजे होऊन गेले आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मंदिरांची निर्मिती केली, तसे त्यांच्या तोडीस तोड मंदिरनिर्मिती आणि त्याद्वारे ईश्वरसेवा या सेंबियन महादेवीने केलेली आहे. तिचे कर्तृत्व अफाट आहे आणि तिची देवभक्ती कमालीची आहे. तिची मंदिरनिर्मिती थक्क करणारी आहे. आपल्या निरलस आणि परमधार्मिक स्वभावामुळे ह्या राणीने प्राचीन भारतीय इतिहासात अढळ स्थान प्राप्त केलेले आहे.
























































