मोठी बातमी: ED-CBI वरून केंद्र आणि राज्यांतील संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित; विचारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court ed cbi

सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या तपासावर केंद्र आणि अनेक विरोधी सरकारे असलेल्या राज्यांमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयानं एक पाऊल पुढे टाकत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी विचारलं की, केंद्र आणि राज्य सरकार या दोघांमधील विरोधी समीकरणांमुळे दोषी सुटू नयेत यासाठी न्यायालयीन देखरेख असू शकते का?

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं, तमिळनाडू पोलिसांनी सीबीआयकडे कथितपणे रंगेहाथ पकडलेल्या EDच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध लाचखोरीचा खटला हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी EDने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. त्यांनी सांगितले यामध्ये कोणत्याही दबावाशिवाय आणि निष्पक्ष चौकशी होईल असा विश्वास देण्यात यावा.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू, EDकडून हजर झाले, त्यांनी खंडपीठाला सांगितले की, लाचखोरीच्या प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली राज्याने, राज्य मंत्र्यांचा समावेश असलेल्या इतर प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे काढून घेतली.

मात्र तमिळनाडू सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणेवर भ्रष्ट अधिकाऱ्याला संरक्षण दिल्याचा आरोप केला. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अमित आनंद तिवारी यांनी राज्यातर्फे हजेरी लावत खंडपीठाला सांगितले की जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले तर भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध काहीही होणार नाही आणि ईडी त्याला संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कसे जाऊ शकते असा सवाल केला. ते म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा तपास राज्य पोलिसांनी केला पाहिजे. संक्षिप्त सुनावणीनंतर खंडपीठाने 20 मार्चची तारीख दिली.

25 जानेवारी रोजी झालेल्या मागील सुनावणीच्या वेळी, न्यायालयाने निष्पक्ष आणि पारदर्शक तपास अयशस्वी होऊ नये म्हणून आणि तपासात कोणताही गैरप्रकार किंवा राजकीय सूडबुद्धी दूर करण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.