मनतरंग- कंट्रोल ऑल्ट डिलीट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> दिव्या नेरुरकर–सौदागर

आपण हक्काच्या माणसाची जेव्हा वाट पाहायला मानसिकदृष्टय़ा तयार होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा स्वतच्या गुण–दोषांना त्रयस्थ नजरेने पाहतो आणि स्वीकारतो. तेव्हाच आपल्याला हळूहळू कळत जातं की, आपल्या भावी आयुष्यासाठी कोणाची निवड करावी. त्यांना अपेक्षाही म्हणू शकतो. पण यात त्या हक्काच्या व्यक्तीला स्थान देताना जर तिच्या गुण–दोषांसकट जर स्वीकारलं नाही तर त्याच अपेक्षा अवास्तव होतात आणि नातं परिपक्व होण्यापूर्वीच संपतं.

 

सुचिता (नाव बदलले आहे) ही तिशीतील अविवाहित तरुणी एका नामांकित कार्पोरेट कंपनीत काम करत होती. हुशार आणि  मेहनती असल्याने तिच्यावर कायम जबाबदारीची कामे टाकली जात. त्या जबाबदाऱयाही ती लीलया पेलत असे. बऱयाच वेळेस तिला ओवरटाईम करावा लागे. त्यामुळे तिला घरी परतण्यासाठी अनेकदा रात्रीचे दहा वाजत. तरीही जेवणाच्या टेबलवर तिचे आई-वडील तिची वाट बघत असत आणि एकत्रच जेवण करत. सुचिताचे वडील नुकतेच निवृत्त झाले होते. आई अजूनही नोकरी करत होती. आधुनिक विचारसरणीचे आई-वडील लाभल्याने सुचिताही तशी आधुनिक विचारांचीच होती. “मॅम, मला आता माझ्याच फॉरवर्ड थिंकिंगची भीती वाटायला लागली आहे,” असं म्हणत तिने समस्या सांगण्यास सुरुवात केली.

सुचिताच्या म्हणण्यानुसार ती हल्ली चिडचिडी आणि उतावीळ झालेली होती. तिला आत्मविश्वास गमावल्यासारखा वाटत होता. तिचा कामातला आणि इतर गोष्टींतला रस हळूहळू संपत चालला होता. याला कारण होते ते तिला प्रेमातून आलेले वैफल्य. सुचिताचा आधी दोन वेळा प्रेमभंग झाला होता. त्या सगळय़ा ताणातून जातच असतानाच तिला पुन्हा एकदा प्रेमाची अनुभूती आली ती तिच्या ऑफिसमध्येच तिच्यासोबत काम करणाऱया एका सहकाऱयाच्या रूपात. पण हा अनुभव तिला मनस्ताप देणारा ठरला होता. कारण तो सहकारी विवाहित होता. सुरुवातीला एका प्रोजेक्टवर काम करताना दोघांचे सूर जुळायला सुरुवात झाली. सुरुवातीचा काळ गेल्यानंतर त्या सहकाऱयाला आपण विवाहित असल्याची उपरती झाली आणि त्याने सुचितामध्ये गुंतणे कमी केले. मात्र सुचिताला हे जमले नाही.

जसजसा तो सहकारी तिच्यापासून लांब राहू लागला तसतशी ती अधिकाधिक त्याच्यात गुंतत गेली. सतत मेसेजेस, ऑफिसात त्याच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न, त्याने निदान ऑफिसच्या वेळात तरी तिला वेळ द्यावा म्हणून ती सतत खटाटोप करायला लागली. त्याला तिचे हे वागणे आवडत नव्हते आणि त्याने बऱयाचदा तिला समज देऊनही सुचिताने त्याच्या मागे लागणे बंद केले नव्हते. शेवटी एक दिवस त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्याने चिडून तिचा नंबरच ब्लॉक केला.

“मला त्या दिवशी इतकं फील झालं न मॅम! काय सांगू? खूप डिसगस्टिंग वाटत होतं. मला तो सडनली अटेन्शन द्यायचा बंद झाला. सगळे पुरुष सारखेच,” असे म्हणत सुचिता ओक्साबोक्शी रडायला लागली.

त्या सत्रात सुचिता भरपूर रडली. तिचे रडणे समुपदेशनाची दिशा सोपे करून गेले. कारण तिचे अश्रू तिच्या झालेल्या अपमानाबद्दल, स्वतला स्वतबद्दल वाटणाऱया लाजेबद्दल बरेच काही सांगून गेले. अशा प्रकारे मोकळे झाल्यावर तिला खूप बरे वाटले.

वरकरणी सुचिता जरी नोकरीत स्थिरस्थावर होती तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती वयाच्या तिशीतही स्थिर नव्हती. तिच्या मानसिक आणि शारीरिक पातळीवर असणाऱया गरजांसाठी तिला तिचा हक्काचा माणूस हवा होता. त्यासाठी तिच्या काही अपेक्षाही होत्या आणि त्या पूर्ण न झाल्यानेच तिला तिन्ही वेळा अपयश आलेले होते. “मलासुद्धा कोणीतरी स्पेशल म्हणावं, कोणीतरी अटेन्शन द्यावं ही अपेक्षा मी बाळगली तर तो माझा आग्रह टोकाचा आहे का? का मला प्रेम नाही मिळालं?” असा सुचिताने सत्रामध्ये प्रश्न विचारला.

“तू स्वतला कधी स्पेशल वाटून घेतलं आहेस का?” असा तिला प्रतिप्रश्न करताच ती भांबावली.“म्हणजे? ‘में अपनी फेवरेट हू’ टाईप्स का?” असे तिने विचारले.

“हो. असं कधी तुला आतून वाटलं आहे का? किंवा तू कधीतरी शांत बसून स्वतचा विचार केला आहेस का?”

“म्हणजे कसा?” सुचिता आता थोडी स्वतच्या दुःखाच्या कोषातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात वाटली.

“म्हणजेच आपण हक्काच्या माणसाची जेव्हा वाट पाहायला मानसिकदृष्टय़ा तयार होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा स्वतच्या गुण-दोषांना त्रयस्थ नजरेने पाहतो आणि स्वीकारतो. तेव्हाच आपल्याला हळूहळू कळत जातं की, आपल्या भावी आयुष्यासाठी कोणाची निवड करावी. त्यांना अपेक्षाही म्हणू शकतो. पण यात त्या हक्काच्या व्यक्तीला स्थान देताना जर तिच्या गुण-दोषांसकट जर स्वीकारलं नाही तर त्याच अपेक्षा अवास्तव होतात आणि नातं परिपक्व होण्यापूर्वीच संपतं.” हे ऐकताच सुचिता पटकन म्हणाली, “आता कळतंय, मी प्रत्येक रिलेशनशिपमध्ये घाई केली. माझ्या पार्टनरने मला माझ्या कल्पनेप्रमाणेच ट्रीट केलं पाहिजे म्हणून मी उतावीळ झाले आणि माझ्या अपेक्षाभंगाच्या दुःखात समोरच्याला ब्लेम केलं व स्वतची कीव करत बसले.” असे म्हणतच तिने कुठे आणि काय चुका केल्या होत्या त्याबद्दलही मन मोकळे केले. तिला आता सल होता तो म्हणजे चुकीच्या व्यक्तीची निवड केल्याचा.

“आता मी स्वतमध्ये काय बदल आणू?” सुचिता आता बरीच मेहनत घेत होती आणि स्वतच्या नैराश्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. सुचिताला या उपायांवर काम करताना तीन महिने लागले. तिनेसुध्दा मोठय़ा चिकाटीने स्वतच्या मनाचे ‘कंट्रोल ऑल्ट डिलीट’ बटन दाबून ठेवले आणि आयुष्याच्या पीनवर नव्या जोमाने पुन्हा टाईप करायला सुरुवात केली.

 [email protected] (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)

 

– भूतकाळ उगाळत न राहता तो स्वीकारणे आणि त्याला पूर्णविराम देणे.

– स्वतसाठी (छंद, मित्रपरिवार) वेळ राखून ठेवणे.

– मनस्ताप देणाऱया चर्चा टाळणे.

– करीअरवर लक्ष केंद्रित करणे.

– मोबाईलवर जुन्या कटू आठवणींचा फोटोज आणि कुठलेही मेसेजेस असतील तर ते डिलीट करणे.

– जीवनशैलीत बदल करणे.

– स्वतला स्वीकारणे आणि स्वतचा जास्तीत जास्त विकास करणे.