
माहीम समुद्रकिनारी फिरायला गेलेली पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. मुंबईत धुळवडीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा होत असताना या दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. लाईफ गार्डच्या मदतीने चार मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. चौघांपैकी दोघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण बेपत्ता असून रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
कॉलेजात शिकणारी ही मुले सोमवारी सायंकाळी हिंदुजा हॉस्पिटलच्या मागील चौपाटीवर फिरण्यासाठी गेली होती. मात्र, समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. मुंबई अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत लाईफ गार्डच्या मदतीने मुलांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. यात चार मुलांना बाहेर काढण्यात यश आले. हर्ष किंजले (19) ओम लोध (17) या दोघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झाला, असे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, वर्सोवा येथील सागरकुटीर चौपाटीवर एका 52 वर्षीय व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचीदेखील घटना घडली आहे.






























































