
मारणाऱयापेक्षा वाचवणारा मोठा असतो. दुसऱया महायुद्धात असाच एक देवदूत निष्पाप मुलांच्या मदतीला धावून आला. हिटलरने ज्यूंची खुलेआम कत्तल सुरू केली होती. ज्यूंचा नरसंहार सुरू होता. त्याचदरम्यान एक 29 वर्षांचा तरुण पुढे सरसावला. मोठय़ा हिमतीने, अचूक नियोजन करून त्याने 669 ज्यू मुलांना जर्मनीच्या ताब्यातील झेकोस्लोवाकिया येथून इंग्लंडला सुरक्षितपणे नेले. होलोकॉस्टच्या या हीरोचे नाव आहे निकोलस विंटन.
होय, निकोलस विंटन त्या शेकडो मुलांसाठी देवदूतच! निकोलस विंटन यांनी कधीही, कुठेही या गोष्टीची वाच्यता केलेले नव्हती. पण एके दिवशी त्यांच्या पत्नीला घरातील पोटमाळय़ावर एक सुटकेस सापडली. त्या सुटकेसमध्ये नाझींच्या तावडीतून सोडवलेल्या मुलांची आणि त्यांना दत्तक घेणाऱया पालकांचा पत्ता होता. त्यामुळे निकोलस यांचे मानवतेचे कार्य जगासमोर आले. पाच दशकांनंतर एका टीव्ही शोमध्ये निकोलस यांना बोलावण्यात आले होते, त्या वेळी त्याच मुलांनी टाळय़ा वाजवून यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केल्याने निकोलस यांना अश्रू अनावर झाले.
असे राबवले ऑपरेशन…
दुसऱया महायुद्धात ज्यू लोकांवर होणाऱया अनन्वित अत्याचाराची माहिती मिळताच निकोलस विंटन काही मित्रांच्या मदतीने प्राग येथे पोहोचले. निर्वासितांचे पॅम्प म्हणजे छळछावण्या होत्या. तिथल्या मुलांची सुटका करण्याचे निकोलसने ठरवले. ‘झेक किंडरट्रान्सपोर्ट ऑपरेशन’ असे नाव देण्यात आले. त्यांनी निर्वासित मुलांना सांभाळतील अशा पालकांची यादी तयारी केली. ज्यांना मुले नाहीत, अशा दांपत्यांनी निर्वासित मुलांना सांभाळायची तयारी दर्शवली. आधी नाझींच्या तावडीतून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढणे महत्त्वाचे होते. अनेक आव्हाने, अडचणी यासारख्या समस्यांना तोंड देत 14 मार्च 1939 साली प्राग येथून मुलांना घेऊन पहिली ट्रेन सुटली. त्यानंतर सहा महिन्यांत 669 ज्यू मुलांना घेऊन एक मोठे ऑपरेशन यशस्वी केले.
-2015 साली वयाच्या 105 व्या वर्षी निकोलस विंटन यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनावर ‘वन लाईफ’ हा चित्रपट अलीकडे आला.




























































