Pune crime news – ननाशीत बाप-लेकाकडून शेजाऱ्याची हत्या

दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे बुधवारी सकाळी बाप-लेकाने जुन्या वादातून शेजाऱ्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. धडावेगळे केलेले त्याचे मुंडके, कुऱ्हाडीसह त्यांनी पोलीस चौकी गाठली. या धक्कादायक घटनेने ननाशी हादरले आहे. दिंडोरी तालुक्यातील ननाशी हे गाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या गावात सुरेश बोके व गुलाब वाघमारे (35) हे शेजारी राहतात. त्यांच्यात काही महिन्यांपासून वाद होते. बोके यांच्या नात्यातील एक मुलगी बेपत्ता झाली, याला वाघमारे जबाबदार असल्याच्या संशयावरून वाद उफाळला. त्यांच्यात बुधवारी सकाळी हाणामारी झाली. सुरेश व मुलाने कुऱ्हाडीचे मानेवर घाव घालून गुलाब यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, कडक बंदोबस्त तैनात आहे. रात्री उशिरापर्यंत पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.