
दक्षिण मुंबईतील मंत्रालयाशेजारील मोक्याच्या जागी असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडे कराराची मुदत आता 31 डिसेंबर 2054पर्यंत राहणार आहे. वास्तविक मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या भाडे कराराची मुदत संपली होती.
भाजपच्या प्रदेश कार्यालयासाठी 1989मध्ये मंत्रालयाजवळील एलआयसी कार्यालयाच्या समोरील 2 हजार 682 चौरस फूट आकाराची जागा भाडे कराराने देण्यात आली. या भाडे कराराला राज्य सरकारने वेळोवेळी मुदतवाढ दिली. या जागा वापराबाबतच्या भाडेकराराची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपली होती. त्यामुळे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2054 अशा 30 वर्षांच्या भाडे करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- भाडे कराराला मुदतवाढ देताना राज्य सरकारने प्रदेश भाजपला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या प्रचलित दरानुसार सरकारला भाडे अदा करावे लागेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करणे बंधनकारक असणार आहे. भाडे आणि भाडे थकबाकी वसुलीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असेल.


























































