
आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या माध्यमातून तुम्ही दहशतवादाच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यामुळे दहशतवादाविरोधात आवाज उठवून लढण्यासाठी सरकारवर दबाव आणा, अशी विनंती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या वडिलांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केली. आज राहुल गांधी यांनी हाथीपूर येथे जाऊन शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राहुल गांधी यांनी शुभम यांच्या वडिलांना काय मदत हवी असे विचारले असता त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे भरल्या डोळय़ांनी दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा बोलून दाखवली. यावर राहुल गांधी म्हणाले, पहलगाम हल्ल्यात बलिदान देणाऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, असे ते म्हणाले. या वेळी शुभम यांची पत्नी ऐशान्या यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ऐशन्या यांनी आक्रोश करत घडल्या प्रसंगाचा थरार कथन केला.





























































