
मामाच्या गावी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सहा मुलांचा मेश्वो नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दिव्या रामजीभाई सोलंकी, भूमिका भूपेंद्रभाई जाधव, जिनल पंकजभाई सोलंकी, ध्रुव पंकजभाई सोलंकी, फाल्गुनी आणि मयूर अशी मृतांची नावे आहेत. गुजरातमधील कनिज गावात ही हृदयद्रावक घटना घडली.
सर्व मुले अहमदाबादहून कनिज गावात त्यांच्या मामाच्या घरी सुट्टी घालवण्यासाठी आली होती. बुधवारी संध्याकाळी सर्व जण मेश्वो नदीत अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मुलं बुडू लागली. नदीजवळ असलेल्या नागरिकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही मुलाला वाचवता आले नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक रहिवाशांनी तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व सहा मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह मेहमदाबाद सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.