वेव्हज ही संस्कृती आणि क्रिएटिव्हीटीची लाट, नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त रुप नसून ते संस्कृती आणि क्रिएटिव्हिटीची लाट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट या कार्यक्रमाला संबोधित केले. या चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी मीडिया आणि एंटरटेन्मेंट जगतातील मोठ्या व्यक्ती एकत्र आल्या आहेत.

आज वेव्हजनिमित्ताने 100 हून अधिक देशांतील कलाकार, गुंतवणूकदार आणि पॉलिसी मेकर्स मुंबईत एकाच छताखाली एकत्र आल्याचे सांगतानाच वेव्हजचे उद्दिष्ट मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील लोकांना एकत्र आणणे आहे. भविष्यात वेव्हज पुरस्कार देखील सुरू केले जातील. हे माध्यमांतील सर्वात प्रतिष्ठत पुरस्कार असतील, असेही मोदी म्हणाले. दरम्यान, हिंदुस्थानच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल असेही मोदी म्हणाले.

भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग 100 अब्ज डॉलर्सचा होईल–अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे मत आहे की आगामी दशकात भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात चारपट वाढ होऊ शकते आणि हे क्षेत्र 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करू शकते. सध्या हा बाजार सुमारे 28 अब्ज डॉलर्सचा आहे. मुकेश अंबानी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट 2025 मध्ये बोलत होते.