
मुंबई महापालिकेच्या माहीममधील वुलन मिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. धारावीची युवश्री सर्वानन ही विद्यार्थिनी 93.02 टक्के मिळवून पहिली तर अर्पित यादव हा 91.08 टक्के गुण मिळवत दुसरा आला. दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी महापालिका मुख्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई महापालिकेकडून 2020-21 साली जी-उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलन मिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत आयसीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. 2024-25 मध्ये या शाळेत इयत्ता दहावीचा वर्ग होता. त्यामध्ये एकूण 27 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले. त्यापैकी 7 विद्यार्थी 81 टक्के व त्याहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुंबई पब्लिक स्कूल वुलन मिल आयसीएसई मंडळाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
हे शिक्षण व्यवस्थेत बदल घडवणाऱ्या संकल्पनेचे यश
मुंबई पब्लिक स्कूल (आयसीएसई), वुलन मिल, माहीम येथील सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळेच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! पालिकेच्या पहिल्या आयसीएसई शाळेने दहावीच्या पहिल्याच बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल मिळवून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. ही केवळ शाळेचीच नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेत बदल घडवणाऱ्या आपल्या संकल्पनेचेही यश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वुलन मिल शाळेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.