अर्थ खात्यात शकुनी महाभाग, अजितदादांवर संजय शिरसाट भडकले

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या मुद्दय़ावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट प्रचंड संतप्त झाले असून, अर्थखात्यात शकुनी महाभाग बसलेत अशा शब्दांत त्यांनी वित्तमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याला घरचा अहेर दिला आहे. सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल तर हे खाते बंद करा, असे हताश उद्गारही त्यांनी काढले.

सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने महायुती सरकारने सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला आहे. वास्तविक, या दोन खात्यांतील निधी अशा प्रकारे वळवता येत नाही. पण तरीही हा निधी वळवल्याने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट संतप्त झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

अर्थखात्याकडून मनमानी सुरू आहे. अर्थखाते आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या सगळय़ा गोष्टी मी घालणार आहे. अशा गोष्टी करणे कायदेशीर नाही. असे करणे चुकीचे आहे. अर्थ खाते आपल्याला वाटते तेच खरे असे वागत आहे. याला माझा विरोध आहे. सहन करायची एक मर्यादा असते. यापेक्षा तुम्ही जास्त करीत असाल तर मला वाटते की, सरळ सर्वच निधी ‘कट’ करून टाका, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी थयथयाट केला.

एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी भागम्भाग

एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाही. अक्षय्य तृतीयेला लाडक्या बहिणींना हप्ता देण्याचा वायदा महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केला होता, पण मे महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झालेला रोष शांत करण्यासाठी आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी खात्यात धावपळ सुरू आहे.