जैन मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांना गुजरातमध्ये मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

शिवडी येथील जैन मंदिरात घुसून चोरांनी देवांच्या जवळपास सात लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिन्यांवर डल्ला मारला होता; पण रफीक अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शिताफीने तपास करून गुजरातमध्ये जाऊन लपलेल्या सुनीलसिंह दाभी, राहुल सिंह वाघेला आणि जिगरसिंह वाघेला या आरोपींना बेडय़ा ठोकल्या.

शिवडीच्या ए.डी. मार्गावर असलेल्या जैन मंदिरात 22 एप्रिलच्या रात्री चोरीची घटना घडली होती. चोर बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून मंदिरात घुसले आणि सात लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. हा प्रकार दुसऱया दिवशी उघडकीस आल्यानंतर आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला, मात्र चोरांनी पळून जाताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही पॅमेरा व डीव्हीआरची वायर कापून त्याचे नुकसान केले होते. तसेच आरोपींनी चेहऱयावर रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर उपायुक्त रागसुधा आर व वरिष्ठ निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वेगवेगळ्या 29 ठिकाणांवरील 70हून अधिक सीसीटीव्ही पॅमेरे तपासले. तेव्हा तिघे आरोपी कोण ते स्पष्ट झाले. त्यानुसार त्या तिघांची अधिक माहिती काढली असता ते गुजरातच्या भाकरमोटी गावचे असल्याचे समोर आले. पोलीस पथकाने लगेच ते गाव गाठून तिघांना पकडून आणले.