
समृद्धी महामार्गावर चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता एका स्कोडा गाडीतून आलेल्या चौघांनी डॉक्टर महिलेच्या गाडीला आडवी गाडी लावून लुटमार केल्याची घटना उघडकीस आली. लुटमार करणाऱ्यांनी महिलेच्या पतीस मारहाण केली, तर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 12 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील डॉ. चैताली श्रावण शिंगणे (35) व पती डॉ. श्रावण शिंगणे हे बोईसर जि. पालघर येथे क्लिनिक चालवितात. डॉ. श्रावण शिंगणे यांच्या मावस्भावाचे शेलगाव देशमुख (ता. मेहकर) येथे 1 मे रोजी लग्न होते. हे लग्न आटोपल्यानंतर डॉ. चैताली व पती श्रावण शिंगणे, मुलगा व डॉ. चैताली यांची आई मीना निंभोरे हे कार (एमएच 48 एटी 0277) ने पालघरला जाण्यासाठी निघाले होते.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ते पोखरी फाटा, शिवाजीनगर जि. बुलढाणा येथून निघाले होते. ते सव्वादहा वाजता करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या पुढे आल्यानंतर त्यांचा 60 किलोमीटरपासून पाठलाग करणारी विनानंबरची स्कोडा कार आली होती. या स्कोडा कारचालकाने अचानक डॉ. चैताली यांच्या कारच्या समोर येऊन कार उभी केली. त्यातून चौघेजण खाली उतरून शिंगणे यांच्या कारजवळ आले. आम्ही विमावाले आहोत, असे म्हणत कारची चावी काढून घेतली. त्यानंतर डॉ. श्रावण शिंगणे यांना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्यापैकी एकजण डॉ. लूट चेताली बसलेल्या बाजूने आला. त्याने दरवाजा उघडून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच सोन्याची पोत हिसकावून घेतली.
त्यानंतर लगेच पाठीमागे बसलेल्या मीना निंभोरे यांच्या गळ्यातील लक्ष्मीहार, सोन्याची पोत, सोन्याची छोटी पोत बळजबरीने हिसकावून घेतली. तसेच दोन मोबाईलही हिसकावून घेतले. हा ऐवज हिसकावून घेतल्यानंतर निघून जात असताना डॉ. श्रावण शिंगणे यांनी त्यांच्या स्कोडा गाडीला पाठीमागून धडक दिली. मात्र, चोरट्यांनी खाली उतरून पुन्हा पतीला मारहाण करून गाडीची चावी तोडून टाकली आणि जिवे मारण्याची धमकी देत निघून गेले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करीत आहेत.