पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक, लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. हिंदुस्थानने पाकड्यांची चौफेर कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. मात्र पाकड्यांशी दोन हात करण्यापूर्वी अस्तनीतले निखारे शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबच्या अमृतसर येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहो. पलक शेर मसीह आणि सुरज मसीह अशी दोघांची नावे आहेत. दोघांनीही लष्कराची छावणी आणि एअरबेसचे फोटो शत्रूराष्ट्राला पाठवले, असे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.

प्राथमिक तपासामध्ये दोघांचाही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. अमृतसरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या हरप्रती सिंग उर्फ पिट्टूमार्फत त्यांनी पाकिस्तानशी संपर्क स्थापित केल्याचेही पोलिसांनी सांगितले. दोघांवर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचेही पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.